पाकिस्तानातील कट्टर दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका अतिरेक्यासह दोघांना मुंबई पोलिसांनी पायधुनी येथून अटक केली. फारुख अहमद गुलाम अहमद नकू (३७) असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. भारतातल्या महत्त्वाच्या स्थळांची रेकी करून तो पाकिस्तानमधील म्होरक्यांना पाठवत होता. त्याच्याकडे २७ हजार रुपयांच्या बनावट नोटाही सापडल्या आहेत, असे सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी मंगळवारी वार्ताहर परिषदेत सांगितले.
काश्मीरमधील एक इसम पायधुनीच्या रिलॅक्स गेस्टहाऊसमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी या गेस्टहाऊसवर छापा घालून त्याला अटक केली. त्याच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे, सात हार्ड डिस्क, संगणक तसेच २७ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. या गेस्टहाऊसमध्ये राहून तो अंमली पदार्थाची तस्करी तसेच बनावट नोटा चलनात आणत असल्याचे आढळून आले आहे. या अतिरेक्याला आश्रय देणारा गेस्टहाऊसचा मालक मोहम्मद तालुकादार (३२) यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
फारुख नकू हा हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय सदस्य होता. गेल्या दीड वर्षांपासून तो नवी मुंबईत राहात होता. तेथील एपीएमसी मार्केटमध्ये सुकामेवा विकण्याचे काम करीत होता. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि जम्मू-काश्मीर येथून आणलेला सुकामेवा तो विकून हिजबुल मुजाहिद्दीनचे काम करीत होता. २००१ ते २००७ या कालावधीत त्याने पाकमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले होते. २००१ पासून त्याने अनेकदा वाघा सीमा ओलांडून संघटनेच्या म्होरक्यांची भेट घेतली होती. २००९ मध्ये फारुखला संदेश देवाणघेवाणीचे अत्याधुनिक असे विशेष प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये मिळालेले होते. राष्ट्रीय स्मारके, लष्करी तळे, भारतीय लष्करांच्या हालचाली यांची रेकीही फारुखने केली होती, असे रॉय यांनी सांगितले. बारामुल्ला जिल्ह्य़ातील युरी धरण तसेच त्यावरील ऊर्जा प्रकल्प, बारामुल्ला पुलाची रेकी केली होती. तसेच लष्करी कारवाईत ठार झालेल्या अतिरेक्यांची छायाचित्रे पाठवली होती. ही सर्व माहिती तो अत्याधुनिक पद्धतीने पाकमधील म्होरक्यांना पाठवत होता, असेही रॉय यांनी स्पष्ट केले.
संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर!
भारतीय गुप्तचर यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी फारुख नकू याने अत्याधुनिक यंत्रणेचा आणि अनोख्या पद्धतीचा वापर सुरू केला होता. तो रिंगा आणि स्काईप सॉफ्टवेअरचा वापर करीत होता. ई-मेलने तो संदेश पाठवत नसे. जी माहिती पाठवायची आहे ती तो ड्राफ्ट फोल्डरमध्ये साठवून ठेवत असे. त्याचा पासवर्ड मात्र पाकमधील म्होरक्यांकडे असायचा. त्यांचा कॉमन ई-मेल आयडी होता, असेही रॉय यांनी सांगितले.