मुंबई : गोवा येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेली काही वर्षे सातत्याने पाच ते सहा मराठी चित्रपटांची निवड होऊन ते दाखवले जातात. यंदा ५४ व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेल्या अधिकृत यादीत एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. कथाबाह्य चित्रपट विभागातील तीन लघुपट सोडले तर चित्रपट विभागात एकाही मराठी चित्रपटाची निवड झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची लगबग; सचिव समितीवर जबाबदारी

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांनी चित्रपटगृहांतही बऱ्यापैकी आर्थिक यश मिळवले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातूनही मराठी चित्रपट सातत्याने पुरस्कार मिळवत आहेत. असे असूनही देशातील प्रतिष्ठित महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकाही मराठी चित्रपटाला मान्यता न मिळण्याची नामुष्की ओढवली आहे. इफ्फी महोत्सव यंदा २० ते २८ नोव्हेंबर रोजी पणजी येथे होणार आहे. या महोत्सवासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एनएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन पॅनोरमा विभागातर्फे देशभरातील उत्तम चित्रपटांची निवड केली जाते. या वेळी महोत्सवासाठी निवड झालेल्या २५ विविध भाषिक भारतीय चित्रपटांची आणि कथाबाह्य चित्रपट विभागातील २१ चित्रपटांची यादी इंडियन पॅनोरमाने जाहीर केली. या यादीत सहा मल्याळम, तीन बंगाली आणि इतर कन्नड, तमिळ, हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. मात्र या यादीत एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळवता आले नाही.

कथाबाह्य चित्रपट विभागात सुमिरा रॉय यांचा ‘भंगार’, प्रथमेश महालेंचा ‘प्रदक्षिणा’ आणि अभिजीत अरविंद दळवी यांचा ‘उत्सवमूर्ती’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. इंडियन पॅनोरमाच्या चित्रपट विभागाच्या परीक्षण समितीतील सदस्यांमध्ये दिग्दर्शक संजय जाधव आणि दिग्दर्शक मििलद लेले या मराठी चित्रपटकर्मीचा सहभाग होता. ‘गेली काही वर्षे इफ्फी महोत्सवात मराठी चित्रपटांचा डंका वाजलेला आहे. यंदा मात्र मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागासाठी आलेल्या ११ चित्रपट प्रवेशिकांमध्ये एकही मराठी चित्रपट नव्हता.  जे मराठी चित्रपट होते ते स्पर्धेतील इतर चित्रपटांच्या तुलनेत चांगली मते मिळवू शकले नाहीत,’ अशी माहिती परीक्षण समितीचे सदस्य मििलद लेले यांनी दिली.

‘इफ्फी’तील मराठी चित्रपट

२०२१ च्या इफ्फी महोत्सवात ‘मी वसंतराव’, ‘बिटरस्वीट’, ‘गोदावरी’, ‘फनरल’ आणि ‘निवास’ असे पाच चित्रपट आणि कथाबाह्य चित्रपट विभागात ‘मर्मर्स ऑफ जंगल’ अशा सहा मराठी चित्रपटांचा समावेश होता. ‘गोदावरी’ चित्रपटाला महोत्सवात पुरस्कारही मिळाला. गेल्या वर्षीही ‘फ्रेम’, ‘शेर शिवराज’, ‘एकदा काय झालं’, ‘धर्मवीर’ या चार विविधांगी मांडणी असलेल्या चित्रपटांबरोबर ‘रेखा’ हा कथाबाह्य विभागातील चित्रपट इफ्फी महोत्सवात दाखवला गेला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian panorama 2023 announces official selection for 54th iffi no marathi film selected zws