मुंबई : जपानच्या धर्तीवर भारतीय रेल्वेमध्ये पॉड हॉटेलची निर्मिती केली जात आहे. भारतीय रेल्वेमध्ये सर्वप्रथम मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेल उभारले. त्यानंतर सीएसएमटी येथे पॉड हॉटेलची व्यवस्था उभी केली. तर आता मुंबईकरांसाठी सर्वाधिक जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माथेरानमध्ये पॉड हॉटेल सुरू केले जाणार आहे. माथेरानमधील पर्यटनांचा सर्वोत्तम सुविधा पुरवण्यासाठी पॉड हॉटेलची उभारणी मध्य रेल्वेकडून केली जात आहे.
जपानमध्ये सर्वप्रथम पॉड हॉटेलची संकल्पना मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी तात्पुरती जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली. तर, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटीवर पॉड हॉटेलची उभारणी झाली. या पॉड हॉटेलमध्ये पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्यात येते. पॉड हॉटेलला मिळणारी पसंतीमुळे मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील ऑनलाइन निविदा सप्टेंबर २०२३ रोजी काढली. यशस्वी बोलीकर्त्याने ८,१९,००० रुपये वार्षिक रकमेसाठी करार सुरक्षित केला. कराराची पहिली तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना शुल्कात १० टक्के वार्षिक वाढ करण्याच्या तरतुदीसह एकूण कराराचा कालावधी १० वर्षांचा आहे. ७५८.७७ चौ.मी.चे एकूण क्षेत्रफळावर पॉड हॉटेल पसरलेले आहे.
हेही वाचा : ‘बीवी सताए, हमें बताएं’, मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या समर्थनार्थ समूहाकडून अनोखी जनजागृती
मुंबई आणि आसपासच्या नागरिकांसाठी सर्वात जवळचे असलेले पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध माथेरान प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक नेरळ-माथेरान मिनी ट्रेनद्वारे सेवा दिली जाते. नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या ऑपरेशनच्या शतकाहून अधिक वर्ष साजरे करणारी, नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ही भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वेपैकी एक आहे. तसेच आता माथेरानच्या निसर्गरम्य ठिकाणी पॉड हॉटेल सुरू केले जाणार आहे. हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या नवीन नाविन्यपूर्ण ‘नॉन फेअर रेव्हेन्यू इन्कम स्कीम’ (एनआईएनएफआरआईएस) चा एक भाग आहे, ज्याचा उद्देश माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वाढीव आराम, परवडणारे आणि किफायतशीर निवास पर्याय उपलब्ध करून देणे आहे.
माथेरान येथील पॉड हॉटेलमध्ये एकेरी पॉड्स, दुहेरी पॉड्स आणि कौटूंबिक पॉड्स असतील. ज्यामुळे पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी निवासाचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. या वातानुकूलित पॉड्समध्ये मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सेवा, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या जास्तीत जास्त आराम आणि गोपनीयता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. पॉड हॉटेलसाठी आरक्षण सेवा उपलब्ध असून मोबाइल अॅपद्वारे आरक्षण करण्याची सेवा उपलब्ध असेल. दरम्यान, माथेरान येथे ‘पॉड हॉटेल’च्या सेवेमुळे पर्यटकांना उत्तम सेवेसह पर्यटनाला चालना मिळणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.