ठाण्यासाठी सोमवारी महाव्यवस्थापक व पालिका आयुक्तांचा दौरा
देशातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगवान प्रवासाचे आणि त्याचमुळे देशाच्या विकासाचे साधन ठरलेली भारतीय रेल्वे सध्या पाणीपुरवठादाराच्या भूमिकेत शिरली आहे. देशभरात सर्वाधिक धरणे असलेले राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रातील लातूरमध्ये सध्या ‘जलदूत’ नावाची रेल्वेचीच गाडी पाणीपुरवठा करत असताना आता मुंबईजवळच्या नवी मुंबई आणि ठाणे या दोन शहरांना पाणी पुरवण्यासाठीही रेल्वे पुढे सरसावली आहे. रेल्वेच्या दिघा येथील धरणातून या दोन शहरांना पुढील तीन महिने पाणी उपसा करता येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने याची सुरुवात केली असून सोमवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त ठाण्यासंदर्भात पाहणी करणार आहेत.
गेल्या वर्षी अगदीच कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्राच्या मराठवाडय़ासह अहमदनगर येथेही दुष्काळी परिस्थिती आहे. लातूर शहरासह जिल्’ाातही सुरुवातीला १५ दिवसांतून एकदा आणि त्यानंतर महिन्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. ही परिस्थिती लक्षात येताच रेल्वेने आपल्या विशेष गाडीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरुवातीला दहा डब्यांतून ५० लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर २५ डब्यांची गाडी पाठवण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व पाणी मध्य रेल्वेच्या मिरज स्थानक परिसरातील ऐतिहासिक विहिरीतून उपसले होते. हे पाणी रेल्वेच्या हद्दीतीलच होते.
आता यापुढे जात मध्य रेल्वेने मुंबईलगत असलेल्या नवी मुंबई आणि ठाणे या दोन शहरांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वेने ठाणे-बेलापूर मार्गाजवळ असलेले आपले दिघा येथील धरण खुले केले आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. दिघा धरणात आठ एमएलडी एवढा पाणीसाठा आहे. पुढील तीन महिने नवी मुंबई महापालिका या पाण्यातून उपसा करू शकणार आहे. नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता ठाणे शहरासाठीही या धरणातून पाणी घेण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांत हालचाली सुरू झाल्या आहेत. याच संदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांची बठक सोमवारी होणार आहे.
देशाच्या आपत्कालीन स्थितीत रेल्वे नेहमीच पुढे
देशावर जेव्हा जेव्हा नसíगक संकटे कोसळली आहेत, तेव्हा रेल्वेने पुढाकार घेतला आहे. भूज येथे भूकंप झाल्यानंतर एका दिवसात उखडलेला रेल्वेमार्ग प्रस्थापित करून रेल्वेने मदत पाठवली होती. नेपाळ भूकंपावेळीही रेल्वेने ‘रेलनीर’सह पाणीपुरवठा केला होता. महाराष्ट्र भीषण दुष्काळाला सामोरा जात असताना पुन्हा एकदा रेल्वे पुढे येऊन मदत करणार आहे. आमच्याकडून शक्य होईल, तेवढी मदत केली जाईल. या दिघा धरणातून पुढील तीन महिने दोन्ही शहरांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल.
– ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद (महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे)