मुंबई : अमेरिकन सिनेटर तसेच संरक्षण विभाग युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांवरील तात्काळ निदान व उपचारासाठी अमेरिकास्थित एका तरूण भारतीय संशोधक व उद्योजकाकडे एका अपेक्षेने पाहात आहे. या तरुणाने तयार केलेला इलेट्रॉनिक्स मेडिकल डिव्हाईस युद्धात जखमी होणाऱ्या जवानांच्या आजाराचे तात्काळ मुल्यमापन करून उपचार सुचविण्याची क्षमता ठेवणारे असून अमेरिकेच्या संरक्षण दलाच्या लष्कर, नौदल व हवाईदलाने आपल्या जवानांसाठी हे मेडिकल डिव्हास घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे व्हाईट हाऊन व कॅपीटल हिलमध्ये यासाठी दोन्ही हाऊसच्या सिनेटरांसमोर या तरुण संशोधकाने आपल्या डिव्हाईचे (संशोधनाचे) सादरीकरण केल्यानंतर त्याच्या कामाची सिनेटरांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी महेश गलगलीकर याने यवतमाळमधील इंजिनियरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली. याच काळात मेडिकल डिव्हाईस बनविण्याचे वेगवेगळे प्रयोग त्याने केले तसेच काही शोधनिबंध तयार केले. सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महेशचा शोधनिबंध गौरविण्यात आला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी महेश अमेरिकेतील रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दाखल झाला. २०११ ते २०१३ मध्ये एमएस पूर्ण केल्यानंतर लगेचच मेडिकल डिव्हाईस फॉर रिमोट पेशंट मॉनिटरिंग या विषयात स्टार्टअप कंपनी सुरु केली. यातही त्याने वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्या संशोधनाची व तरुण उद्योजक म्हणून केलेल्या कामाची दखल घेत अमेरिकन सरकारने २०१७ मध्ये महेशला ‘आईनस्टाईन व्हिजा’ दिला एवढेच नव्हे तर अमेरिकन नागरित्व देण्याची तयारी दाखवली. या सर्व कालावधित त्याने एकूण सात पेटंटही मिळवली.
आणखी वाचा-बुडालेल्या ठेवी परत मिळण्याची शक्यता! न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर शासनाकडून परिपत्रक जारी
मेडिकल डिव्हाईसवरील संशोधनाला वेगवेगळे आयाम देत असतानाच महेशने २०२० साली ‘कार्डिओ जेनिक्स’ नावाची आणखी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यामतून दोन प्रकारच्या मेडिकल डिव्हाईसच्या विकासाचे काम त्याने हाती घेतले. यातील एका प्रकारात सार्वजिक वा खजगी रुग्णालयातील रुग्णाच्या शरीरावर एक डिव्हाईस बसवून त्याच्या आरोग्याच्या नेमक्या प्रश्नांची माहिती मिळेल अशी व्यवस्था केली. यात ईसीसी,बीपी पासून आरोग्याचे वेगवेगळ्या आजारांचे दूर अंतारवरून डाग्नोस करण्याची व्यवस्था केली. भारतासारख्या देशात जेथे एक लाख लोकसंख्येमागे एक आयसीयू बेड आहे अशा व्यवस्थेत याचा निश्चितपणे परिणामकारक उपयोग होऊ शकतो. कोणत्याही रुग्णालयातील सामान्य बेडचे यामुळे आयसीयूत रुपांतर होऊ शकते. कारण सामान्य बेडवरील रुग्णाला महेश याने तयार केलेला इलेट्रॉनिक्स डिव्हाईस बसविल्यास रुग्णाच्या ईसीजी, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब तसेच तापापासून अनेक आजारांचे अचूक निदान करता येणार असून त्यानुसार डॉक्टरांना लगेच उपचार करणे शक्य होणार आहे.
महेशच्या दुसऱ्या प्रकल्पाने अमेरिकेचा संरक्षण विभाग प्रभावित झाला असून हा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस अगदी अफगाणीस्तानच्या डोंगराळ भागातील लढाईत एखादा अमेरिकन सैनिक जखमी झाल्यास त्याच्या जखमांमुळे शरीराववर होणार्या परिणांची अचूक नोंद होणार आहे. यात केवळ ईसीजी, रक्तदाब, ऑक्सिजन पातळीच नव्हे तर त्या सैनिकाच्या जखमांचे योग्य वैद्यकीय मुल्यमापन होऊन त्याला रक्त लागणार आहे का तसेच त्याच्या तणावाचीही (स्ट्रेस)ची नोंद होणार आहे. परिणामी हजारो मैलावरील सैनिकाच्या आरोग्याचे तात्काळ निदान होऊन नेमकी वैद्यकीय मदत करता येणार आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाताही वापर केला जाणार असून सॅटेलाईट, थ्री जी, फोर जी सह अगदी वायफायनेही मॉनिटर करता येणार असल्याचे महेश गलगलीकर यांनी सांगितले. सुरुवातीला अमेरिकन संरक्षण दलाने आठ ते दहा जवानांवर याचा प्रयोग केला.यात जवानाच्या छातीवर एक छोटासा डिव्हाईस बसवला जातो व त्याच्या माध्यमातून नियंत्रण केले जाते. आता सरक्षण दलाच्या लष्कर,नौदल व हवाईदलानेही हा उरक्रम स्वीकारला असून सुमारे २०० जवानांच्या छातीवर डिव्हाईस बसवून मॉनिटरिंग केले जाणार आहे.
आणखी वाचा-वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते
महत्वाचे म्हणजे व्हाईट हाऊस व कॅपीटल हिल म्हणजे अमेरिकन पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहातील वैद्यकीय व संरक्षण विषयक सिनेटरांपुढे महेशच्या या संशोधावर सखोल चर्चा झाली. यात सिनेटरांनी अनेक मुद्दे उपस्थित केले तसेच मीही मला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची माहिती दिल्याचे महेश म्हणाला. आता त्याच्या या संशोधन तथा व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन विभागाने आर्थिक सहाय्यही मंजूर केले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकन नागरिकत्व घेण्यासाठी आग्रह केला आहे.
खरतर महेशचा जीव भारतात गुंतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ व ‘स्टार्टअप इंडिया’चे आवाहन केले तेव्हाच त्याने पुण्यात एका कंपनीची स्थापना करून सरकार दरबारी तसेच मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे आपल्या मेडिकल डिव्हाईसचे संशोधन करून मदत मिळविण्याचे बरेच प्रयत्न केले होते. त्याच्या मेडिकल डिव्हाईसचा वापर शासकीय रुग्णालयातील सामान्य बेडवरील रुग्णासाठी केला तरी आयसीयूतील सुविधांसारखे झटपट निदान होऊन उपचार करणे शक्य होणार आहे. २०१७ मध्ये काड्यापेटी एवढ्या छोटे ईसीजी मशीन महेशने तयार केले होते. चालताना अगदी धावत असेल तरी हे मशीन अचूक ईसीजी दाखवते.
२०१७ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महेशच्या संशोधनाची माहिती मिळतात त्यांनी त्याला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी बोलावून तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री फडवीस यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून महेशला एमआयडीसीमध्ये महेशला उद्योग व संशोधनासाठी जागा देण्याचे आदेश दिले. मात्र लालफितीच्या चक्रात महेशला जागा मिळाली नाही आणि तो परत अमेरिकेला गेला. आज अमेरिकेत त्याला रेड कार्पेट अंथरले जात आहे. अमेरिकन पार्लमेंटमध्ये बोलावून सिनेटर चर्चा करतात तसेच संरक्षविभाग त्याच्या संशोधनासाठी सढळ हाताने निधी देत आहे. मात्र अजूनही महेशने अमेरिकन नागरिकत्व घेतलेले नाही कारण भारतातील गोरगरीब रुग्णांसाठी त्याची काम करायची इच्छा आहे. प्रश्न आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि लालफितीचा चक्रव्यूह भेदण्याचा.