तुम्ही रागावलात.. आनंदी आहात.. घाबरला आहात अशा तुमच्या भावनांचा वेध घेणारा कॅमेरा तयार झाला आहे. मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या भावना काय आहेत हे ओळखण्यापासून ते एखाद्या व्यक्तीवर किती ताण आहेत इथपर्यंत सर्व गोष्टी ओळखण्याची क्षमता या कॅमेरामध्ये आहे. अशाच प्रकारे हृदयरोगांपासून ते त्वचारोगांपर्यंतच्या विविध आजारांची प्राथमिक चाचणी करण्यासाठीची लघु उपकरणे ‘मॅचेस्टस तंत्रज्ञान संस्थे’च्या (एमआयटी) मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यार्थ्यांनी विकसित केली आहेत.
वैद्यकीय सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचावी यासाठी जगभरात विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. याचच एक भाग म्हणून एमआयटीमधील प्रा. रमेश रासकर यांच्या पुढाकाराने २०१४मध्ये मुंबईतील वेलिंगकर व्यवस्थापन शिक्षण संस्थेत एका प्रयोगशाळेची संकल्पना मांडण्यात आली. संस्थेचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी ही संकल्पना पुढे नेत २०१५मध्ये संस्थेत एका कार्यशाळेचे आयोजन केले. यानंतर संस्थेत एक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली. तेथे अभियांत्रिकी विद्यार्थी आणि व्यवस्थापन शिक्षण संस्थेतील विद्यार्थी एकत्रित प्रयोग हाती घेतले. या प्रयोगांना मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीमधील तज्ज्ञही नेमण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेले प्रयोग शुक्रवारी संस्थेत सादर करण्यात आले.
सेन्सकॅम
माणसाच्या भावनांपासून त्याच्यावर किती ताण आहे हे ओळखणारा अनोखा कॅमेरा सॉफ्टवेअर ओतक्रिस्ट गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक कपासी, वृद्धी शाह आणि रोहित भास्कर यांनी विकसित केला आहे. यामध्ये कॅमेरासमोर आपला चेहरा नेला की आपला चेहरा आनंदी आहे की दु:खी आहे, आपल्याला राग आला की भीती वाटली आहे अशा आठ भावनांची ओळख करून देतो. याचबरोबर हृदयाचे ठोके, ताण समजू शकणार आहे. याचबरोबर अपंग व्यक्तींना व्यक्त होण्यासाठीही हा कॅमेरा उपयुक्त ठरू शकतो असे विद्यार्थ्यांनी सांगितले. सध्या हे सॉफ्टवेअर ६३ टक्के अचूक अंदाज देते, पण भविष्यात हा अंदाज ९५ टक्के अचूक मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
स्किनस्पेक्ट
हृदयरोगापासून विविध रोगांसाठी तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. मात्र त्वचारोग ओळखण्यासाठी वापरण्यास सोपे असे उपकरण अद्याप विकसित झालेले नाही. यासाठी अंशुमन दास यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षत वाही, अपराजिता साहू, इशान कोठारी या विद्यार्थ्यांनी स्किनस्पेक्ट नावाच्या प्रकल्पात दोन उपकरणे विकसित केली आहेत. यातील मोबाइल क्लिप ऑन या उपकरणाच्या माध्यमातून त्वचेचे चांगल्या दर्जाचे छायाचित्र उपलब्ध होणार आहे. याचबरोबर स्पेक्टोमीटर तयार करण्यात आलेले आहेत, यामध्ये त्वचेचा तपशील नोंदविला जाणार आहे. ही दोन्ही उपकरणे एका मोबाइल अ‍ॅपशी जोडली जाणार असून त्यामध्ये तपासणीचे निकाल समजू शकणार आहेत.
लाइटइअर
जगभरात अब्जावधी लोकांना कानाचे आजार आहेत. हे आजार शोधण्यासाठी सध्या मोठे मशीन्स वापरले जातात. यासाठी छोटय़ा स्वरूपातील यंत्राच्या साह्य़ाने कानाच्या पडद्याचे आणि कानाच्या आतील भागांचे छायाचित्र घेऊन त्याद्वारे डॉक्टरांना नेमके काय झाले आहे हे समजू शकेल असे उपकरण अंशुमन दास यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा रस्तोगी या विद्यार्थ्यांने विकसित केले आहे. अशाच प्रकारची डोळ्यांसाठीची उपकरणे एल. व्ही. प्रसाद नेत्र संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहेत. यामध्ये आयलॅबेलिट, अँटेरिओर सेगमेंट इमेजिंग आणि रॅपआय या उपकरणांचा समावेश आहे.
याशिवाय झोपेच्या विकारांसाठी ‘आराम’ तर हृदयविकारासाठी ‘कार्डिओ २४’ हे प्रकल्पही विकसित करण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांची वैद्यकीय पातळीवरील तपासणी आणि प्रबंध सादरीकरण सुरू आहेत. हे पूर्ण झाल्यावर आवश्यक त्या परवानग्या घेऊन ती वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.

Story img Loader