भारतातील पर्यटनक्षेत्राची दिशा गेल्या वर्षभरात बदलली असून याआधी युरोप, अमेरिका आदी देशांतील पर्यटनस्थळांना पसंती देणाऱ्या भारतीय पर्यटकांनी आपला मोर्चा पूर्वेकडील काही देशांकडे वळवला आहे. डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया, त्यामुळे वाढलेले टूर्सचे दर, पूर्वेकडील देशांमधील व्हिसाची सहजता या अनेक घटकांमुळे भारतीय पर्यटकांचा प्रवास ‘अपूर्वाई ते पूर्वरंग’ असा झाला आहे. यंदा नाताळ आणि नववर्ष हा पर्यटनाचा मोसम पकडून युरोप किंवा अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. या सर्वानी दुबईबरोबरच मलेशिया, थायलंड, सिंगापूर, श्रीलंका अशा देशांना पसंती दिली आहे. तर देशांतर्गत पर्यटनात केरळ, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डॉलरच्या आंतरराष्ट्रीय दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटकांना हा खर्च परवडेनासा झाला आहे. तर युरोचा दरही वाढला आहे. पर्यटन कंपन्यांनाही आपल्या परदेश वाऱ्यांच्या पॅकेजेसमध्ये २० टक्क्यांनी वाढ करावी लागली आहे. वर्षभरापूर्वी युरोपची एक टूर दीड लाखांना होती. आता हीच टूर १.८० लाख एवढी महागली आहे, असे ‘केसरी टूर्स’चे प्रमुख शैलेश पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पश्चिमेच्या वाढत्या महागाईने पूर्वेचे स्वस्तातील देश बघण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. यात सर्वात आघाडीवर थायलंड आणि दुबई हे दोन देश आहेत. या दोन्ही देशांत पाच-सहा दिवसांची एक टूर माणशी ३५ हजारांपेक्षाही कमी दरात होते. त्यामुळे मलेशिया, सिंगापूर, थायलंड, बँकॉक, पट्टाया, श्रीलंका, दुबई या देशांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
गेल्या वर्षी युरोप-अमेरिका हा पर्याय निवडणाऱ्या प्रत्येक १०० पर्यटकांपैकी ४० पर्यटक हे आता या देशांकडे वळले आहेत. परदेश प्रवास करताना विमान तिकिटांचे आगाऊ आरक्षण केले, तर पर्यटकांना खूपच फायदा मिळतो. मात्र देशांतर्गत प्रवासात विमान तिकिटांमुळे पॅकेजचा दर वाढत असल्याचे मधुचंदा ट्रॅव्हल्सतर्फे सांगण्यात आले.

देशांतर्गत पर्यटनात केरळ, राजस्थान, काश्मीर यांची चलती
देशांतर्गत पर्यटनाचा विचार करता सर्वाधिक पसंती केरळ आणि राजस्थान या दोन राज्यांना असल्याचे मधुचंदा ट्रॅव्हल्सतर्फे सांगण्यात आले. केरळ सरकारने पर्यटनावर दिलेला भर आणि डिसेंबर-जानेवारी महिन्यात राजस्थानमध्ये असलेली महोत्सवांची धूम यामुळे या दोन राज्यांना अधिक पसंती मिळते. केरळ पाहण्यासाठी सात ते आठ दिवस पुरेसे आहेत. तर संपूर्ण राजस्थान पालथा घालण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. या दोन्ही राज्यांची पॅकेजेस साधारण २५-३० हजार माणशी आहेत. डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येथे जाणाऱ्यांची संख्या फार नसली, तरी दुर्लक्षित करण्यासारखीही नाही. या कालावधीत देशातील पर्यटकांच्या पाच ते दहा टक्के पर्यटक या दोन राज्यांमध्ये जात असल्याचे शैलेश पाटील म्हणाले. या पर्यटकांमध्ये तरुणांचा भरणा जास्त असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. या कालावधीत या दोन्ही राज्यांमध्ये बर्फ असल्याने बर्फावरील खेळ खेळण्यासाठी तरुणाई येथे गर्दी करते.
रुळलेल्या पर्यटनाशिवाय ऑफबिट पर्यटनाकडेही पर्यटकांचा ओढा असल्याचे हार्मनी टूर्सच्या कौस्तुभ जोशी यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सहल, लोणार येथे आकाशदर्शनाची सहल, वाईन टूर, कोकण टूर ऑन बाईक, म्युझिक फेस्टिव्हल टूर अशा चाकोरीबाहेरच्या टूर्सनाही पर्यटकांचा प्रतिसाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जास्त संख्येने पर्यटक अशा टूर्सना येत नसले, तरी हळूहळू ऑफबिट पर्यटनाचा ट्रेंड भारतात सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader