प्रसाद रावकर

देशभरात पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मुंबईत तर उद्रेकच झाला आहे. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने निर्बंध कडक करून संसर्गाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  मुंबईतील करोना केंद्रेही पुन्हा सुरू करण्यात आली, तर रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला. मात्र नागरिकांकडूनच सहकार्य मिळत नसेल तर रुग्णसेवेसाठी कोटय़वधी रुपये खर्च करून काय उपयोग?

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि यंत्रणांची डोकेदुखी सुरू झाली. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी निरनिराळय़ा उपाययोजना करण्यात आल्या. अगदी करोनाचा प्रभाव अधिक असलेल्या भागातील रस्ते र्निजतुक करण्यात आले होते. त्याची जबाबदारी अग्निशमन दलावर सोपविण्यात आली होती. मात्र अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित होऊ लागले आणि नवे संकट पालिकादारी उभे राहिले. अखेर रस्ते र्निजतुकीकारणाची योजना बासनात गुंडाळून ठेवावी लागली. बंदोबस्तासाठी तैनात पोलीस, आरोग्य सेवेसाठी तत्पर असलेले डॉक्टर, परिचारिका, पालिका, दळणवळणाची जबाबदारी खांद्यावर असलेले बेस्ट कर्मचारी मोठय़ा संख्येने बाधित झाले होते. त्यापैकी काही जण दगावलेही. आजही त्या दिवसांची आठवण झाल्यानंतर या मंडळींच्या अंगावर काटा उभा राहतो. पुन्हा एकदा मुंबईत करोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे सावध पावले उचलण्यात येत आहेत. मात्र कितीही सावधगिरी बाळगली तरीही पोलीस, पालिका, बेस्ट, आरोग्य सेवेतील कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. या सर्वाचा गर्दीतील वावर त्यास कारणीभूत आहे. विनाकारण गर्दी करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

 या वेळी करोनाच्या जोडीला त्याचेच उत्परिवर्तीत रूप ओमायक्रॉनही आहे. त्यामुळे यंत्रणेची चिंता वाढली आहे.  आजघडीला दैनंदिन रुग्ण संख्या २० हजारांच्या घरात पोहोचली आहे. गर्दीची ठिकाणे, गृहविलगीकरणातील मंडळींकडून धुडकावण्यात येणारे नियम आदी बाबी रुग्णवाढीस कारणीभूत ठरत आहेत. नाटय़गृह, चित्रपटगृह, उपाहारगृहांवर निर्बंध घालण्यात आले असले तरीही बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.  मुंबईमधील बाजारपेठा आजही गर्दीने फुलून जात आहेत. या गर्दीवर नियंत्रण मिळवायचे कसा, असा प्रश्न यंत्रणांसमोर आहे. केवळ गर्दीच नव्हे तर नागरिकांचा निष्काळजीपणाही करोनाला आमंत्रण देत आहे. अनेक मुंबईकर आजघडीला सर्दी आणि खोकल्याने बेजार झाले आहेत. काहींना तर सर्दी, खोकल्यासोबत तापही येत आहे. यापैकी बहुतांश मंडळी करोनाची चाचणी करण्याऐवजी खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेऊन घरीच राहात आहेत. त्यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अधिकच धोकादायक आहे.  करोना चाचणी केल्यानंतर बाधा झाल्याचे स्पष्ट होताच करोना केंद्रात जावे लागेल अशी भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. करोना केंद्रांमध्ये परिस्थिती कशी असेल, सुविधा चांगल्या असतील का, अन्य रुग्णांपासून आपल्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होणार नाही ना, असे अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात डोकावत आहेत. त्यामुळेच अनेक मुंबईकर लक्षणे असतानाही करोनाची चाचणी टाळून घरीच उपचार घेणे पसंत करीत आहेत. मुंबईकरांच्या मनातील ही भीती दूर करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. तीही यंत्रणांना पार पाडता आलेली नाही.

संसर्ग झपाटय़ाने वाढत असला तरीही अनेक मुंबईकर करोनाविषयक नियम पायदळी तुडवत आहेत. अनेकांना मुखपट्टीचा विसर पडला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे कारण पुढे करीत काही मंडळी मुखपट्टीचा वापर टाळू लागले आहेत. तर काही जण बेजबाबदारपणे मुखपट्टीविना फिरत आहेत. ही बेजबाबदार मंडळी स्वत:च्या आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या मंडळींना रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. या मंडळींसाठी दंडात्मक कारवाई पुरेशी दिसत नाही.  आपल्याला करोना होणार नाही, मुळात करोना वगैरे असे काहीच नाही असा काही मुंबईकरांचा समज आहे. या मंडळींना करोना होणारच नाही असे वाटत असेल तर त्यांना पालिकेने करोना रुग्णांच्या सेवेची जबाबदारी सोपवावी. म्हणजे त्यांचा हा दावा कितपत टिकतो हे पाहता येईल. दुसरीकडे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या पालिका प्रशासनालाच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. लोकप्रतिनिधींकडूनही प्रशासनाला साथ मिळत नसल्यामुळे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे अवघड बनत आहे. मग आता मुंबईकरांनीच मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांना लगाम घालायला हवा. तरच संसर्ग रोखण्यात काही अंशी यश येईल.

सर्दी, खोकला अथवा ताप अशी लक्षणे असलेले काही महाभाग सर्रास समाजात फिरत आहेत. त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत आहे. करोना म्हणजे सर्दी, खोकला, ताप इतकेच असा यापैकी बहुतांश मंडळींचा समज आहे. त्यामुळे करोनाकडे ही मंडळी गांभीर्याने पाहात नाहीत. खासगी डॉक्टरकडे औषधे घेऊन बरे होता येते असाच या मंडळींचा समज आहे. ही वृत्ती घातक आहे. अशा मंडळींमुळे त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य आणि आसपासचे रहिवाशीही बाधित होत आहेत.  लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अशा मंडळींची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालय वा करोना केंद्रांतील दाखल रुग्णांची संख्या तुलनेत कमी आहे. परंतु गृहविलगीकरणातील रुग्ण नियम पाळत आहेत का, त्यांच्यामुळे अन्य नागरिक बाधित होत आहेत का यावर कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे गृहविलगीकरणही घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचे कुणालाच सोयरसूतक नाही.

नागरिक जर ऐकत नसतील तर मग टाळेबंदी लागू करायची का, असा प्रश्न येतो. पण त्यामुळे अर्थचक्र खोळंबून नवे प्रश्न निर्माण होतील. तसे होऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकानेच करोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. करोनाविरोधातील लढाई ही केवळ सरकारी यंत्रणांची नाही. नागरिकांचीही जबाबदारी आहे. नागरिकांनी बेजबाबदार वागून चालणार नाही. प्रशासन चूकत असेल तर नक्कीच त्याकडे लक्ष वेधायला हवे. पण नागरिकांनी आपल्या जबाबदारीचेही भान राखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आतापर्यंत करोना प्रतिबंधक उपाययोजना, रुग्ण सेवा आदींसाठी पालिकेच्या तिजोरीतील कोटय़वधी रुपये खर्च झाले. नागरिक असेच बेजबाबदारपणे वागत राहिले तर भविष्यातही पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल.  भविष्यात निधीची कमतरता निर्माण झाल्यास नागरी सेवांवर परिणाम होईल आणि त्याचा फटका तुम्हा आम्हा मुंबईकरांनाच सहन करावा लागेल. तेव्हा आताच सावध व्हा आणि नियमांचे गांभीर्याने पालन करा. prasadraokar@gmail.com

Story img Loader