मुंबई : दिल्लीहून मुंबईचा विमान प्रवास साधारण २.१० तासांचा असतो. मात्र १३ जुलैला दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोचे विमान तब्बल आठ तास उशिरा पोहचले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) वर उतरल्यानंतर अनेक प्रवाशांनी विमान कंपनी आणि विमान कर्मचाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. दिल्लीवरून १३ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजता इंडिगोचे विमान सुटणे अपेक्षित होते. मात्र, या विमानाला ४५ मिनिटे उशीर लागल्याचे कळविण्यात आले.
हेही वाचा >>> मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा
रात्री ११ वाजता विमान मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. मात्र, पुन्हा विमानातील इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडून आणखीन विलंब होणार असून रात्री १२.३० वाजता विमान उड्डाण करेल असे सांगण्यात आले. अखेर रात्री १२.३० वाजता प्रवासी विमानात चढले. मात्र, विमानातील वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती. त्यामुळे प्रवाशांना विमानात उकाडायला लागले. काहीच वेळात विमानाचे उड्डाण होईल अशी आशा प्रवाशांना होती. मात्र, पहाटे ३ वाजेपर्यंत विमानाचे उड्डाण झाले नाही. विलंब आणि वातानुकूलित यंत्रणा नसल्याने प्रवासी प्रचंड संतापले. एका ज्येष्ठ प्रवाशाला विमानातच घेरी आल्याने प्रवाशांचा संयम सुटला. त्यानंतर पहाटे ३.१० वाजता विमानातून उतरण्यास परवानगी मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. परंतु, त्यानंतर तब्बल दोन तासांनी म्हणजे पहाटे ५ वाजता दुसऱ्या विमानात प्रवासी चढले. मात्र त्याचे उड्डाणही लांबले. अखेरीस सकाळी ७.४४ वाजता दिल्लीवरून निघालेले विमान सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर पोहचले.