उद्धव ठाकरे यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

मुंबई : इंदिरा गांधींनाही त्या वेळी पर्याय नव्हता. मात्र सर्व जण एकत्र आले आणि जुन्या राजवटीला उलथवून टाकले हा इतिहास आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेच्या ‘मार्मिक’ या नियतकालिकाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ ऑगस्टला काय बोलावे, असा प्रश्न पडला आहे. आम्हाला कधी प्रश्न पडला नाही की काय बोलावे. कारण आम्ही जनतेचा आवाज म्हणून काम केले. मोदी यांनी खरे बोलावे एवढीच अपेक्षा आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. ‘वन नेशन-वन इलेक्शन’साठी अमित शाह यांनी पत्र दिले आहे याचा उल्लेख करत लोकांच्या घरात रेशन नसले तरी यांना फरक पडत नाही. त्यांना इलेक्शन हवे आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.आज लोक अस्वस्थ आहेत. लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय आहे? लोक रस्त्यावर आणि तुम्ही इलेक्शनच्या मागे आहात, अशी टीका भाजपवर करताना  ठाकरे यांनी नोकऱ्याच नसल्याच्या गडकरींच्या विधानाची आठवण करून दिली.

सर्व निवडणूक प्रचारात  पंतप्रधान नको

देशात लोकशाही रुजवायची असेल तर सर्व निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधानांनी जाता कामा नये ही आमची जाहीर मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनीही सर्व निवडणुकीत जाऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘चोरपावलांनी येणारी आणीबाणी मोडीत काढा’

देशात दुसरी आणीबाणी आली अशी कुजबुज सुरू आहे. एक काळ असा होता की माध्यमे सरकारवर लक्ष ठेवायची. आता सरकार माध्यमांवर लक्ष ठेवताना दिसते आहे. चोरपावलांनी आणीबाणी लादली जात असून ती मोडीत काढावी लागेल, असे उद्धव ठाकरे सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात म्हणााले.

Story img Loader