२०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहिलं असून धक्कादायक दावा केला आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने पत्रात केला आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं आहे असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार याच आधारे सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ पासून इंद्राणी मुखर्जी भायखळा जेलमध्ये आहे. गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची शक्यता आहे.

काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण –

इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याला पिस्तुलसोबत पोलिसांनी अटक केल्यानंतर शीना बोरा हत्याकांड उघडकीस आला होता. चौकशीदरम्यान त्याने आपण अजून एका प्रकरणात सहभागी असल्याचं सांगत हत्याकांडाचा साक्षीदार झाला. इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये गळा दाबून शीना बोराची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

पुढील तपासात शीन इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती असं निष्पन्न झालं.

मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जीने शीना आणि मिखेल या आपल्या दोन मुलांना गुवाहाटीत आपल्या आई-वडिलांकडे सोडलं होतं. मॅगजिनमध्ये इंद्राणी मुखर्जीचा फोटो पाहिल्यानंतर शीनाला तिने पीटर मुखर्जीसोबत लग्न केलं असल्याची माहिती दिली.

यानंतर शीनाने मुंबई गाठत इंद्राणीची भेट घेतली. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचं सांगितलं. पण २०१२ मध्ये ती अचानक गायब झाली.

शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) शोध घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेलं असल्याचं सांगण्यात आलं.

२०१५ मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.