शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंद्राणीने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जे.जे.रुग्णालयात हलवण्यात आले. आयएनएक्स मीडियाची सहसंस्थापक असलेल्या इंद्राणीवर पोटच्या मुलीची शीना बोराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचा आरोप आहे.
इंद्राणीला जे.जे. रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दोन महिन्यात दुसऱ्यांदा इंद्राणीला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याआधी एप्रिल महिन्यात इंद्राणी रुग्णालयात होती. त्यावेळी तिच्यावर वेगवेगळया चाचण्या करण्यात आल्या. डिप्रेशनच्या औषधांचा ओव्हरडोस घेतल्यामुळे त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
इंद्राणीने एप्रिल २०१२ मध्ये पोटची मुलगी शीना बोराची (२४) हत्या करुन तिच्या मृतदेहाची रायगड जिल्ह्यातील जंगलामध्ये विल्हेवाट लावली होती. या गुन्ह्या प्रकरणी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्ना, चालक शामवर रायला पोलिसांनी अटक केली. ऑगस्ट २०१५ मध्ये हा गुन्हा उघड झाला.