खार येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या शिना वोरा या महिलेच्या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा खार पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात स्टार इंडियाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक करण्यात खार पोलिसांना यश आले असून त्याचबरोबर चालकालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मंगळवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खार परिसरात राहणाऱ्या शीना वोरा यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. रायगड येथील स्थानिक पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला होता. तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात हत्येसह खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्य़ाचा समांतर तपास खार पोलिसांकडूनही सुरू होता. या तपासादरम्यान सोमवारी खार पोलिसांनी इंद्रायणी मुखर्जी आणि तिचा चालक श्याम राय यांना ताब्यात घेतले.
शीना वोरा ही इंद्रायणी यांची बहीण असून त्यांनी तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रायगड जिल्ह्य़ात नेऊन टाकला होता. या कामी इंद्रायणी यांचा चालक श्याम यानेही मदत केली होती. इंद्रायणी मुखर्जी या स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जी यांच्या पत्नी आहेत. या दोघांना अटक केल्यावर मंगळवारी त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थानिक पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी अटकेच्या माहितीला दुजोरा दिला असला तरी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Story img Loader