डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजे ६ डिसेंबरला काही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची तयारी केली आहे. सोमवारी २५ नोव्हेंबरला आठवले यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांना भोईवाडा न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, आनंदराज व त्यांच्या २२ कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. आनंदराज यांनी २७ नोव्हेंबरला स्वत:हून अटक करून घेण्याची तयारी दर्शविली आहे.  
दादर येथील ‘इंदू मिल’च्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, यासाठी रिपब्लिकन पक्षाचे गट व दलित संघटना आंदोलन करीत आहेत.रामदास आठवले यांनी ६ डिसेंबर रोजी मिलमध्ये घुसून स्मारकाचे भूमिपूजन करण्याची घोषणा केली आहे. ६ डिसेंबरला लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर जमतात. अशा वेळी काही गडबड होऊ नये म्हणून प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली
आहे.
पोलिसांनी अटकेची नोटीस दिली आहे, त्याला आपण घाबरत नाही, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी तुरुंगात जाण्याची आपली तयारी आहे, अशी प्रतिक्रिया आनंदराज यांनी व्यक्त केली.
दोन वर्षांनी पोलिसांना जाग
६ डिसेंबर २०११ रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी मिलमध्ये घुसून जागेचा ताबा घेतला होता. त्यानंतर इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीवर आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय जाहीर करावा लागला. मात्र त्याच वेळी आनंदराज आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे आणि २२ कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर आता पोलिसांनी त्यांच्या अटकेच्या नोटिसा जारी केल्या आहेत. २७ नोव्हेंबरला अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indu mill agitation arrest warrant against anand raj and athawale
Show comments