राजकीय फायदा उठविण्याचा काँग्रेसचा बेत फसला!

इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा आणखी काही महिन्यांनंतर करून २०१४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचे भांडवल करण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांचा विचार होता. मात्र आंबडेकरी जनतेचा वाढता दबाव आणि काँग्रेसमधीलच काही खासदारांनीही आणलेले दडपण यापुढे अखेर पक्षश्रेष्ठींना झुकावे लागले आणि महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घोषणा करणे त्यांना भाग पडले, अशी माहिती पुढे येत आहे.
६ डिसेंबरच्या आत इंदू मिल जमिनीच्या हस्तांतरणाचा निर्णय झाला पाहिजे, यासाठी सर्वच रिपब्लिकन गट व दलित संघटना आक्रमक झाल्या होत्या. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने तर मिलमध्ये घुसण्याचा इशारा दिला होता. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेनेही पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी केली होती. आरपीआयच्या विविध गटांचा असा दबाव वाढत असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कायदेशीर प्रक्रियाच्या व तांत्रिक कारणांच्या फेऱ्यात अडकले होते.
दिल्लीत या प्रश्नावर शरद पवार, वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा व रामदास आठवले यांची बैठक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. काँग्रेसमधील सूत्रकडून मिळालेल्या माहितीनुसार कायदेशीर व तांत्रिक अडचणी पुढे करून आणखी वर्ष-सहा महिने हे प्रकरण रेंगाळत ठेवायचे व निवडणुकीच्या आधी सहा-आठ महिने इंदू मिल जमिनीची घोषणा करायची. परिणामी निवडणुकीत त्याचा फायदा घेता येईल, असा काँग्रेसचा बेत होता. परंतु ज्यांच्या मतदारसंघात इंदू मिल व चैत्यभूमी आहे त्या एकनाथ गायकवाड यांनीच आपल्याच पक्षाच्या सरकारविरुद्ध उपोषण करण्याची धमकी दिली. ‘लोकसत्ता’मध्ये त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील बुहतांश खासदारांनी आमचीही उपोषणाची तयारी आहे, असे गायकवाड यांना फोन करून सांगितले.
संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने दिल्लीत खासदारांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. संसदेतील अनुसूचित जाती व जमातीच्या सर्वपक्षीय १६५ खासदारांच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली व काँग्रेसच्या वेळकाढू धोरणावर कडक टीका करण्यात आली. या खासदारांनीही दिल्लीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याची तयारी केली. काँग्रेस श्रेष्ठीपर्यंत ही बातमी पोचल्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना त्याबद्दल विचारणा करण्यात आली. माणिकरावांनी लगेच गायकवाड यांना फोन करून काही गडबड करू नका, आपण दिल्लीत भेटू असे सांगितले. ४ डिसेंबरला मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दिल्लीला रवाना झाले. दुपारी पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड व काँग्रेसचे इतर खासदार आणि आनंद शर्मा यांची उद्योग भवनमध्ये बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही कडक भूमिका घेतली. त्यामुळे आनंद शर्माना नमते घ्यावे लागले व संसदेतच आपण दुसऱ्या दिवशी घोषणा करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. पंतप्रधनांचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याची घोषणा झाली.      

Story img Loader