ठकसेन विजय नाईकने केले मराठी तरुणांना लक्ष्य
एअर इंडियात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या विजय नाईक उर्फ विनय नायक (५८) याचे अनेक प्रताप तपासात समोर येत आहे. त्याने प्रामुख्याने मध्यमवर्गीय मराठी तरुणांना लक्ष्य बनविले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. नायक याने फसवणूक केलेले अनेक जण आता समोर येत आहेत.
एअर इंडियात नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन दहिसर येथील विजय नाईक याने ५७ तरुणांना सुमारे २८ लाखांचा गंडा घातला होता. युनिट १२ ने त्याला अटक केल्यानंतर त्याचा फसवणुकीचा धंदा उघडकीस आला. याबाबत माहिती देताना युनिट १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद खेतले यांनी सांगितले की, विजय नाईक हा मूळचा गोव्याचा. मुंबईत तो दोन-तीन महिन्यांसाठी भाडय़ाने घर घ्यायचा. मुंबईत नोकरीसाठी आलेल्या तरुणांना गाठून त्यांना तो नोकरी देण्याचे आमिष दाखवायचा. पुढच्या आठवडय़ात नेमणुकीचे पत्र घ्यायला या असे सांगून तो या तरुणांना आपले घर दाखवायचा. त्यामुळे हे तरुण आपल्या मित्रांनाही  त्याच्याकडे पाठवायचे. विजय नाईकने नाव बदलून विविध ठिकाणी अनेकांची फसवणूक केली असावी, अशी शक्यता खेतले यांनी व्यक्त केली आहे.
कर्ज काढून पैसे दिले
नायकने फसविल्याचे उघड होताच अनेक जण आता पोलिसांकडे येऊ लागले आहेत. बोईसर येथे राहणारे शुद्धोधन डोंगरे हे मासिक ७ हजार रुपये पगारावर सुरक्षा रक्षकाचे काम करतात. पंरतु मुलाला नोकरी मिळावी यासाठी त्यांनी नायकला पंधरा हजार रुपये दिले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने कर्ज काढल्याचे त्यांनी सांगितले. तर चाळीसगावहून मुंबईला आलेल्या बिपीन पाटील या विद्यार्थ्यांने स्वत:ला आणि भावाला नोकरी मिळावी यासाठी पन्नास हजार रुपये नाईकला दिले होते. नायकला अटक झाली पण पैसे कसे मिळतील, याची  चिंता त्यांना आहे.    

Story img Loader