अनिल देशमुख यांचा सवाल
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. पदावरून हटविण्यात आल्याच्या रागातून त्यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आयुक्तपदी असताना ते गप्प का होते, असा सवाल करीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
१०० कोटींच्या खंडणीच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या देशमुख यांची चौकशी करीत आहे. संचालनालयाच्या पथकाने दिवसभर देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानासह मुंबई आणि नागपूर येथील घरांवर छापे घातले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, चौैकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले. यापुढेही ईडीला चौकशीत सहकार्य करत राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात आल्यावर परमबीर सिंग यांनी आपल्यावर खोटे आरोप केले होते. सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त असताना त्यांची भूमिका संशयास्पद होती, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांना आरोप करायचे होते तर आयुक्तपदावर असताना आरोप करायला हवे होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेले सचिन वाझे, काझींसह पाचही अधिकारी हे थेट परमबीर सिंग यांना माहिती देत होते.
वास्तविक सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अशी साखळी असते. मग हे अधिकारी थेट परमबीरसिंग यांनाच थेट कसे काय भेटून माहिती देत असत. याबाबतही देशमुख यांनी संशय व्यक्त केला. तसेच या प्रकरणात जप्त करण्यात आलेली गाडीही पोलीस आयुक्तालयांतील आहे. या चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.