मुंबई / अलिबाग : उद्योग खात्यातील वाढत्या सत्ताबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे उद्योगमंत्री उदय सामंत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. ‘धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेतले जात आहेत’ अशी तक्रार करणारे पत्रच त्यांनी आपल्या खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना पाठवले आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सचिवांची नियुक्ती करण्याच्या निर्णयामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज असताना उद्योगमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केल्याने सत्ताबाह्य उद्योगांना चाप लावण्यात प्रशासनाला यश येत असल्याचे दिसते.
महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्योग खात्यातील गैरव्यवहारांबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. प्रत्यक्ष सत्तेत नसतानाही उच्चपदस्थांचे स्नेही या खात्यात ढवळाढवळ करत असल्याची उघड टीका झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळापासून (एमआयडीसी) प्रत्येक पातळीवर उद्योगांची अडवणूक होत असल्याचे आरोप होत होते. या आरोपांची दखल घेत ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकीय खंडणीखोरीला थारा नाही’ असे स्पष्ट विधान केले होते. त्याच अनुषंगाने सध्या प्रशासकीय पातळीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून त्यात आपल्याला डावलले जात असल्याची भावना अनेक मंत्र्यांकडून व्यक्त होताना दिसते. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ताजा उद्रेक याच संदर्भात. आपल्या खात्याचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मला अवगत करूनच निर्णय घेतले जावेत. तसेच महत्त्वाच्या कामकाजाबाबत नियमित ‘ब्रिफिंग’ करावे’ अशा सूचना सामंत यांनी या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु यातील बहुतांशी अधिकार केंद्रित करण्यात आले आहेत, असा आक्षेप सामंत यांनी घेतला आहे. महामंडळाच्या पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये गेल्या काही काळात कपात करण्यात आली आहे. हा निर्णय रद्द करून योग्य त्या निर्णयासाठी आपल्याकडे फाईल सादर करावी, अशी सूचनाही सामंत यांनी केली आहे. सामंत यांच्या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहे. यासंदर्भात उद्योग विभागाचे प्रधान सचिव तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
आधी सरनाईक, मग सामंत
काही दिवसांपूर्वीच एस. टी. मंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या सचिवांची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयामुळे बसलेल्या धक्क्यातून सावरत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘अंतिम निर्णय माझाच’ असे जाहीर केले होते. त्यातच आता उदय सामंत यांनीही आपल्या खात्याचा कारभार प्रशासकीय अधिकारी चालवत असल्याचे सूचित करून नाराजी व्यक्त केली आहे. नवे सरकार अस्तित्वात आल्यापासून एमआयडीसीच्या संचालक मंडळाची एकही बैठक झालेली नाही. महामंडळाची शेवटची बैठक निवडणुकीच्या आधी झाली होती. मात्र, महामंडळाकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याबद्दलही सामंत नाराज आहेत.