महिला दिन ‘साजरा’ करण्यासाठी रुग्णांना वाऱ्यावर सोडून सहलीला गेलेल्या आरोग्य केंद्रांतील नऊ डॉक्टरांची आरोग्य विभागाकडून केली जाणारी चौकशी हा फार्स ठरण्याची शक्यता आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे या डॉक्टरांबद्दल विचारणा न करताच चौकशी आटोपती घेण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिला दिन ‘साजरा’ करण्यासाठी दादर-धारावी परिसरातील पालिकेच्या नऊपैकी सात आरोग्य केंद्रांतील सात, तर प्रसवोत्तर केंद्रातील दोन असे एकूण नऊ डॉक्टर बालके, दाम्पत्य आणि रुग्णांना वाऱ्यावर सोडून सहलीला गेले होते. सहलीला जाता यावे यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे रजा मागितली होती. ती नामंजूर झाल्यावर या डॉक्टरांनी दांडीच मारली. सहलीला जाण्यासाठी हे सर्व डॉक्टर सकाळी ७च्या सुमारास एका रुग्णालयात जमले आणि तेथून गाडीने नेरळला रवाना झाले. मौजमजा करून सायंकाळी ते मुंबईत परतले. एकाच वेळी इतक्या डॉक्टरांनी दांडी मारल्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये कामाचा बोजवारा उडाला. मात्र हे सर्व डॉक्टर ‘त्या’ दिवशी आपापल्या जागी कर्तव्य बजावित होते, असे दस्तुरखुद्द पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याऐवजी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारीच या डॉक्टरांना पाठिशी घालत असल्याचे यावरून स्पष्ट होते. आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे आरोग्य केंद्रातील अधिकारीच अडचणीत आले आहेत. नाइलाजाने त्यांना या प्रकरणाची चौकशी करावी लागत आहे, परंतु ज्या अधिकाऱ्याने रजा नाकारली तोच या डॉक्टरांची चौकशी करीत आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दांडीबहाद्दरांची पाठराखण करण्यात येत असल्यामुळे ही चौकशी वरवरची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या ‘दांडीबहाद्दर’ डॉक्टरांपैकी चौघांना नैमित्तिक, चौघांना पर्यायी रजा तर एकास अर्धा दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही ‘त्या’ दिवशी कुठे होतात, तुम्हाला रजा मंजूर केली होती का, असे जुजबी प्रश्न विचारून चौकशी आटोपण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही मंडळी सहलीला गेली त्याबाबत आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांकडे, त्या दिवशी केंद्रात आलेले रुग्ण, दाम्पत्य आदींकडे चौकशी करण्याची गरज आहे. मात्र आरोग्य समितीच्या अध्यक्षांचा रोष ओढवू नये यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी चौकशीचा फार्स करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा