मुंबई : राज्यात सत्ताबदल होताच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (मुंबै बँक) अंतर्गत तडजोड करीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत मजूर म्हणून निवडून आल्यावर सहकार विभागाने अपात्र ठरविलेले विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. याआधी अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी उपाध्यक्ष होण्यात समाधान मानले आहे.
गेल्याच आठवडय़ात मुंबै बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी वैयक्तिक कारण देऊन अचानक राजीनामे दिले. होते. तेव्हाच मुंबै बँकेवर भाजपचा अध्यक्ष येईल, हे स्पष्ट झाले होते. गेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कांबळे यांच्या विरोधात भाजप नेते प्रसाद लाड यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे यंदाही लाड हेच अध्यक्षपदाचा अर्ज भरतील अशी अटकळ होती. परंतु प्रत्यक्षात दरेकर यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे करण्यात आले. या नावाला कोणीही विरोध न केल्याने त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर सिद्धार्थ कांबळे यांनी उपाध्यक्ष होणे पसंत केले. सत्ताबदल होताच कांबळे यांनी स्वखुशीने अध्यक्षपद सोडल्याची चर्चा असली तरी या अंतर्गत तडजोडीमागे भाजप सत्तेवर आल्याचेच कारण सांगितले जात आहे.
दरेकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. मजूर या प्रवर्गातून अपात्र ठरलेली व्यक्ती अन्य प्रवर्गातून निवडून आली असली तरी तिने फसवणूक केलेली आहे. अशावेळी ती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभी कशी राहू शकते, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.
मंत्रिपद हुकणार ?
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागावी म्हणून प्रवीण दरेकर हे प्रयत्नशील आहेत. पण दरेकर यांची मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असा तर्क बांधला जात आहे. मुंबईतून आशिष शेलार यांचे नाव निश्चित असल्याने दरेकर यांना संधी मिळणे कठीण मानले जाते. यातूनच बहुधा दरेकर यांनी मुंबै बँकेचे अध्यक्षपद स्वीकारून त्यातल्या त्यात समाधान मानून घेतले आहे.
अपात्र ठरूनही..
या निवडीमुळे मजूर म्हणून अपात्र ठरलेली व्यक्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडणुकीस उभी राहू शकते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदस्य म्हणून अपात्र ठरल्यानंतर वर्षभर निवडणूक लढविता येत नाही. परंतु दरेकर हे मजूर म्हणून अपात्र असले तरी सहकारी बँक प्रवर्गातून ते निवडून आल्यामुळे अध्यक्षपदासाठी पात्र ठरतात, असा युक्तिवाद सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. अपात्र सदस्याबाबत सहकार कायद्यात स्पष्ट तरतूद नाही, असा दावाही या अधिकाऱ्याने केला.