डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुणालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने डोंबिवली-मुंबई हेलपाटय़ापायी एका अर्भकाचा रविवारी मृत्यू ओढविला.
दावडी गावातील मिनुकुमारी गील (वय २०) हिने कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात रविवारी मुलीला जन्म दिला. बाळ नाजूक असल्याने व बालरोगतज्ज्ञ नसल्याने तिला शीवच्या टिळक रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे जागेअभावी केईएम व वाडिया रूग्णालयात पाठविले गेले. तेथे दाखल करूनही बाळात कोणताही फरक न पडल्याने गील दाम्पत्याने पुन्हा बाळाला डोंबिवलीत उपचारासाठी आणण्याचा निर्णय घेतला. पण वाटेतच बाळाचा मृत्यू झाला.
याबाबत शास्त्रीनगर रूग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रेखा सारस्वत यांनी सांगितले की, रूग्णालयात वॉर्मरची सुविधा आहे. पण बालरोगतज्ज्ञ नाही. मिनुकुमारी यांची प्रसूती नैसर्गिक होती. बाळाला श्वसनाचा त्रास व आईला कांजण्या होत्या. त्यामुळे त्यांना शीव येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.