मुंबई : काही बालकांमध्ये जन्मत:च व्यंग असते. त्यामुळे त्यांना संपूर्ण आयुष्यामध्ये विविध संकटांचा सामना करावा लागतो. यामध्येच जन्मत:च स्पायना बिफिडाने ग्रस्त असलेल्या बालकांमध्ये पाठीचा कणा आणि मेंदूचा विकास होत नाही. त्यामुळे बालकाच्या मेंदूमध्ये पाणी होणे, पाठीला बाक येणे, मूत्रसंस्थेमध्ये बिघाड होणे असे आजार उद्भवतात. त्यामुळे त्यांना आयुष्यभर व्यंगाचा सामना करावा लागतो. मात्र आता अशी बालके गर्भात असताना शस्त्रक्रिया करून त्यांचा दोष दूर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोणतेही बाळ व्यंगाशिवाय जन्माला येऊ शकते, अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया लवकरच भारतामध्ये होणार आहे.
हेही वाचा >>> राज्यात एक महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा; स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना आदेश
दरवर्षी भारतात स्पायना बीफिडा या आजाराने ग्रस्त ४० हजार बालके जन्माला येतात. या आजारामुळे बालकाच्या मानेचा आकार मोठा होतो, मूत्रमार्गात अडथळे आणि काही ट्यूमर होत असून, गर्भाच्या विकासावर विपरित परिणाम होतो. यामुळे ही बालके व्यंगासह जन्माला येतात. अशा बालकांवर साधारणपणे चार ते सहा शस्त्रक्रिया कराव्या लागतात. मात्र यानंतरही हे बाळ पूर्णत: सामान्य आयुष्य जगेल याबाबत शाश्वती नसते. गर्भधारणेदरम्यान पाठीचा कणा आणि मेंदूमध्ये विकसित होणारी न्यूरल ट्यूब पूर्णपणे बंद होत नाही तेव्हा हा आजार होतो. यामुळे पाठीचा कणा आणि रक्तवाहिन्या खराब होऊन बालकामध्ये स्पायना बिफिडा हा मज्जासंस्थेशी संबंधित दोष उद््भवतो. बाळाच्या गर्भावस्थेत आईच्या करण्यात येणाऱ्या विविध चाचण्यांमध्ये स्पायना बीफिडा हा दोषाचे निदान होते. यामुळे गर्भावर वेळेत योग्य उपचार केल्यास कायमचे अपंगत्व घेऊन जन्माला येणारे किंवा बाळाचा जन्मत:च मृत्यू होण्याचे प्रमाण टाळणे शक्य होणार आहे. ही शस्त्रक्रिया गर्भ २४ आठवड्यांचा होण्यापूर्वी करणे आवश्यक असल्याचे लीलावती रुग्णालयाचे बालरोग शल्यचिकित्सक डॉ. संतोष करमकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>> धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?
ही शस्त्रक्रिया करताना गर्भ व आईला भूल देण्यात येते. त्यानंतर गर्भाच्या ग्रीव्हेच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर पुढील ८ ते १० तास गर्भाची कोणतीच हालचाल नसते. अशावेळी गर्भाच्या हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवण्यात येते. त्यानंतर गर्भाची हळूहळू हालचाल होण्यास सुरुवात होते. स्पायना बीफिडाग्रस्त गर्भावर वेळेत उपचार केल्यास सुदृढ बाळ जन्माला येण्याचे प्रमाणे ८० ते ८५ टक्के इतके आहे, अशी माहिती पोलंडमधील गर्भ शल्यचिकित्सक डॉ. एग्निएस्का पास्तुस्का यांनी दिली.
गर्भ शस्त्रक्रियेबाबत डॉक्टरांना करणार मार्गदर्शन लीलावती रुग्णालय, स्पायना बिफिडा फाउंडेशन आणि पोलंडच्या द मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ सिलेसियाच्या संयुक्त विद्यमाने जन्मजात दोष आणि गर्भाच्या आरोग्य समस्यांवर २२ ते २४ मार्च २०२४ दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील नामांकीत तज्ज्ञ आणि संशोधक भारतातील गर्भ शस्त्रक्रिया आणि त्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहे. यामध्ये एफएसयूआय परिषद २०२४ चे अध्यक्ष आणि लीलावती रुग्णालयातील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. संतोष करमरकर, पोलंडमधील गर्भ शल्यचिकित्सक डॉ. एग्निएस्का पास्तुस्का आणि एफओजीएसआयचे अध्यक्ष डॉ. तांदुळवाडकर यांचा समावेश आहे. लीलावती रुग्णालयामध्ये नुकतेच गर्भाच्या शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन करण्यात आले.