मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबीरे तसेच अन्य बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ई-रक्तकोष पोर्टल विकसित केले असून यावर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे थॅलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये म्हणून रक्ताविषयी माहिती http://www.eraktkosh.mohfw.gov.in वर एका क्लिकवर सहजरित्या आता उपलब्ध झाली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम प्राधान्याने सुरू करण्यात आला असून या सुविधेमुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांची रक्तासाठीची वणवण आता थांबणार आहे.
राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, कार्पोरेशन, प्रायव्हेट अशा एकूण ३९५ रक्तपेढ्या असून रुग्णाला वेळेत रक्त मिळण्यासाठी आता आपल्या मोबाईलवर ई-रक्तकोष पोर्टल मार्फत सद्यस्थितीत असलेला रक्ताच्या साठ्याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या पुढाकाराने याचा फायदा वारंवार रक्ताची गरज असणारे रुग्ण उदाहरणार्थ, थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, कॅन्सर इत्यादी रुग्णांना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे. राज्यात आजघडीला ७७ शासकीय रक्तपेढ्या आहेत. तसेच १२ रेडक्रॉस सोसायटीच्या तर २९१ धर्मादाय संस्थाच्या रक्तपेढ्या आहेच. याशिवाय खाजगी संस्थांच्या माध्यमातून १३ रक्तपेढ्याचे काम चालते. राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांपैकी ३६० रक्तपेढ्यांमध्ये रक्तघटक विलगीकरमाची सुविधा उपलब्ध आहे तर १३८ ठिकाणी अफेरेसीस सुविधा असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या रुग्णांसोबतच मोठ्या शस्त्रक्रियांच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. ज्या रुग्णांचे रक्त निगेटिव्ह गटाचे आहे त्यांनाही या पोर्टलद्वारे रक्ताच्या उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. या पोर्टलद्वारे रक्तदात्यांना जवळचे रक्त केंद्र रक्तपेढी तसेच रक्त शिबिराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे जवळपस गेले दशकाहून अधिककाळ रक्त संकलनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. करोना काळातही राज्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रक्तसंकलनाचे काम सुरुच होते. आकडेवारीच्या भाषेत सांगयचे झाल्यास २०२० साली २६,१०४ रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले व त्याच्या माध्यमातून १५ लाख ४६ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये २८,९२६ रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून १६ लाख ७३ हजार रक्ताच्या पिशव्या गोला करण्यात आल्या. २०२२ मध्ये ३४,६७७ रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून १९ लाख २८ हजार रक्तसंकलन झाल तर २०२३ मध्ये ३३,८०७ रक्तदान शिबीरे घेण्यात आली त्यातून २० लाख ४४ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. २०२४ डिसेंबर अखेरीस तब्बल ४३,९०७ रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येऊन २१ लाख ५५ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन झाले आहे. रक्तदान शिबीरांचे प्रमाण दरवर्षी वाढविण्यात राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करण्यात येत असले तरी राज्य रक्तसंक्रमण परिषदेला दिवसेंदिवस अर्थसंकल्पात कमी निधी दिला जात असल्याने अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
या रक्त संकलनातून मोठ्या प्रमाणात रक्त घटक तयार करण्यात आले, ज्यामध्ये पॅक्ड रेड ब्लड सेल, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट ,फ्रेश फ्रोजन प्लाज्मा याचा समावेश असून सदर रक्त घटक आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी वापरण्यात आले आहेत. राज्य रक्त संकलन परिषदेने हे रक्त व रक्त घटकाच्या प्रोसेसिंग चार्जेसचे दर निश्चिती केलेली आहे. या दर निश्चितीच्या मर्यादेतच रक्त केंद्रांना रुग्णासाठी रक्तपुरवठा करणे बंधनकारक आहे. राज्यात आजघडीला आरोग्य विभागाच्या माध्यमातून सिकलसेलच्या रुग्णांना ११,८०२ कार्डांचे वाटप करण्यात आले आहे तर थॅलेसेमीयाच्या १२,५५९ रुग्णांना आणि हिमोफेलियाच्या ५९४१ रुग्णांना मोफत रक्तासाठी कार्ड वाटप करण्यात आले आहे.
महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, कार्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत रक्त संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सुदृढ रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. राज्यामध्ये शंभर पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी संख्या आहे. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, महान दान’ या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित होतात. राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा योग्य दरात उपलब्ध होणे यासाठी राज्य रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांना विचारले असता आगामी काळात राज्य रक्तसंक्रमण परिषद तसेच जे.जे. महानगर रक्तपेढीचे बळकटीकरण करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.