भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेत १९ बंगल्यांचा उल्लेख आहे मात्र, ते बंगले आता नाहीत. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ईडीच्या कारवाईच्या माहितीवरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून अधिकाऱ्यांना माहिती देतात. तसेच कोणत्याही नेत्याच्या घरी कारवाई होण्याआधी किरीट सोमय्या ट्विट करतात असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना मी सर्व माहिती ईडी, आयकर विभागाला, लोकायुक्तांना आणि राज्यपालांना देतो असे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच माहिती कशी मिळते यावर बोलतात पण घोटाळ्यावर बोलले जात नाही असेही किरीट सोमय्या म्हणाले.
याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या हे ईडीच्या कार्यालयात जाऊन बसतात आणि तिथे अधिकाऱ्यांना माहिती देतात, असे म्हटले होते. धाड पडण्याआधी तो मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना अटक होणार आहे असे सांगतो. ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत असे सांगतो, असेही संजय राऊत म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक सातत्याने अटक होणार आहे असे ट्विट करत असतात असे म्हटले होते. यावर आता किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“लोक विश्वासाने माझ्याकडे माहिती देतात. सगळ्यात पहिली माहिती किरीटला नाही कळत. तर सगळ्यात पहिली माहिती ती निर्माण करणाऱ्या घोटाळेबाजाला कळते. त्यांच्याकडची माहिती आम्हाला मिळते. ती फक्त आम्ही ईडी, आयकर विभागाला, लोकायुक्तांना आणि राज्यपालांना देतो. घोटाळा केला आहे त्यावर कोणी बोलत नाही. माहिती किरीट सोमय्याला पहिली कशी मिळाली यावर बोलले जाते,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, सोमय्या यांनी नवाब मलिकांची ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीवरही भाष्य केले. नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत आहेत. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का? या संबंधी तपास करावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तर माफियांना मदत करत असतात, असे किरीट सोमय्या म्हणाले.