घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारी मुंबई आणि त्या काटय़ावर स्वार मुंबईकर. रस्ते गजबजलेले असोत वा रिकामे धावपळ करणे हा मुंबईकराचा जणू काही स्वभावच झाला आहे. त्यांची ही धावपळ प्रत्येक गोष्टीत उतरताना दिसते. प्रवासात, कामात, खाताना आणि फिरायला जातानाही. देशाच्या या आíथक राजधानीत फिरायला जायलाही मुंबईकराना वेळ नाही. चार दिवसांची सुट्टी सोडा, सलग आठ तास जरी मोकळे मिळाले तरी त्यांना हायसं वाटेल, याबाबत तमाम मुंबईकर सहमत होतील. त्यात वर्षअखेरीस अनेकजण सुट्टय़ा टाकून शहराबाहेर धूम ठोकतात; परंतु ज्यांना अशा सलग सुट्टय़ा घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईनजीकच्या ठिकाणांचा हा थोडक्यात आढावा देत आहेत प्रशांत ननावरे. यातील अनेक ठिकाणे तुम्ही ऐकली असतील; परंतु ‘जवळच आहे’, ‘पुन्हा कधी तरी जाऊ’ असे म्हणून टाळली असतील. पण, कायम काँक्रिटच्या जंगलात, कोलाहलात, रेटारेटीत आयुष्य घालविणाऱ्या मुंबईकरांना या ठिकाणची नीरव शांतता, ताजेपणा, निवांतपणा खुलवेल यात शंका नाही. या वातावरणातून मिळणारी मिळणारी ऊर्जा पुढचे पाच-सहा दिवस तरी नक्कीच टिकेल. त्यामुळे ही पुन्हा ‘कधीतरीची वेळ’ या वेळी आहे असे समजा आणि लावा ‘सॅक’ पाठीला!
कान्हेरी लेणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या लेणी आणि त्यांचं ऐतिहासिक महत्त्व अनेकांना अद्याप ठाऊक नाहीत. पण खरं तर शहराच्या जवळ राहून घनदाट जंगलाचा माहौल कान्हेरीच्या वातावरणात आहे. काही काळ आपण केवळ वेगळ्या वातावरणात असतो. एवढेच नव्हे तर आपण चक्क काही शतकं मागेही जातो. कान्हेरी म्हणजे शतकांपूर्वीचे विद्यापीठ. इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत ते वापरात होतं. बौद्ध भिक्खूंचा वावर एकेकाळी सर्वाधिक होता. भारतातल्या त्या वेळच्या महत्त्वाच्या विद्यापीठांपकी एक. तीन थरांमध्ये इथल्या लेणी पाहायला मिळतात. समोरासमोर असलेल्या दोन डोंगरांवर त्या प्रामुख्याने पसरलेल्या आहेत.
कसे जाल? –
कान्हेरी लेणीला जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकापासून (पूर्व) १८८ क्रमांकाची बस आहे जी थेट लेणींच्या पायथ्याशी जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून मिनी टॅक्सीदेखील लेणींच्या पायथ्याशी जातात.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली
मुंबई शहराच्या मध्यभागी असलेलं १०४ चौ.कि.मी.चे जगातील एकमेव जंगल ही या शहराला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, कीटक, पक्षी यांच्या हजारो प्रजाती येथे आढळतात. वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीचीदेखील सोय येथे उपलब्ध आहे. उद्यानातील नदीत वर्षांचे बारा महिने नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे. त्याचबरोबर वनराणी ही मिनी ट्रेन लहानांबरोबरच मोठय़ांच्याही आवडीची झाली आहे. उद्यानातील टेकडीवर असलेले गांधी टोपी हे ठिकाण काही निवांत क्षण घालवण्यासाठी अगदी योग्य जागा आहे.
कसे जाल? –
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली रेल्वे स्थानकापासून (पूर्व) दहा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेरून रिक्षानेही जाता येते. अथवा स्टेशनपासून १८८ क्रमांकाच्या बेस्ट बसनेही उद्यानापर्यंत जाता येते.
एलिफंटा-घारापुरीची लेणी
सौंदर्याचा ठेवा जतन करणारया या गुहा म्हणजे मुंबईतील एक दिवसाची सुनियोजित सहल. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला. इसवी सन ९ वे शतक ते १३ व्या शतकात या कोरण्यात आल्या आहेत. लेणीपर्यंतच्या एक तासाच्या समुद्रातील प्रवासात मुंबईतील उतुंग इमारती, समुद्रावरून प्रवास करणारे पक्षी, समुद्रात असलेल्या विदेशी व्यापारी नौका आदींचे दर्शन होते. बेटावर असलेली मिनी ट्रेन आपल्याला धक्क्यापासून एलिफंटा लेण्यांच्या पायथ्याशी घेऊन जाते. हा प्रवास आपण पायीसुद्धा करू शकतो. येथील लेणी अखंड पाषाणात कोरली असून भारतीय वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहेत. बेटावर एकूण पाच लेणी आहेत. पूर्वी मुख्य लेणीच्या प्रवेश द्वाराजवळ हत्तीची एक अवाढव्य मूर्ती होती जी आज मुंबईच्या जिजामाता उद्यानात आढळते. याच मूर्तीमुळे या बेटाला एलिफंटा हे नाव पडले.
कसे जाल? –
बेटावर जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडियापासून मोटारबोट उपलब्ध आहेत. ही सफर करण्यास ४० ते ४५ मिनिटे कालावधी लागतो. ही नौकासेवा जून ते ऑगस्ट या पावसाळी ऋतूत बंद असते.
वसईचा किल्ला
इसवी सन १४१४ मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा किल्ला उभारला. १५३० मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी याचे महत्त्व जाणून पुनर्बाधणीसाठी घेतला. वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगीजांनी बांधायला सुरुवात केली, तेव्हा या कामाला दहा वर्षे लागली. किल्ला दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. किल्ल्याच्या आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. त्यावरून सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते. तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे. किल्ल्याला दहा बुरूज आहेत. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत तीन चर्च लागतात. बालेकिल्ल्यात दारू-कोठार, सनिकांची वस्तिस्थाने आणि वाडय़ांचे अवशेष आहेत. एका दगडावर कोरलेला शिलालेखसुद्धा आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहीर आहे. किल्ल्यात चिमाजी आप्पांचे स्मारकदेखील आहे. प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला महादेवाचे व वज्रेश्वरीचे मंदिर आहे.
कसे जाल? –
किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई गाठावे. स्थानकापासून किल्ला ६ किमी अंतरावर आहे. वसई स्थानक ते किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान
मिठी नदीच्या पात्रात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली पक्षी निरीक्षणासाठी जायचे. तेव्हा त्यांनी मिठीच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे, असे सांगितले होते. त्यानंतर मिठी नदीच्या पात्राजवळ असलेल्या या डिम्पग ग्राऊंडमध्ये त्यांनी पहिले झाड लावले. त्यांनी आंबा, वड, िपपळ, उंबर, पळस अशी पर्यावरणाला आधारभूत ठरणारी पाच झाडे लावून या उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली. १९९४ साली हे उद्यान तयार झाले. त्या दरम्यान काही झाडे वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही लावण्यात आली. या उद्यानाच्या निर्मितीसंदर्भात पर्यावरणाच्या अभ्यासाचे ध्येय होते. शहराच्या जवळच्या निसर्गाचे या माध्यमातून आज संवर्धन होत आहे. याचा उपयोग जनजागृतीसाठी होत आहे. निसर्ग उद्यानाची निर्मिती करताना इथे कोणतेही पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे मुद्दाम आणलेली नाहीत. हे पक्षी, पाखरे उद्याननिर्मितीदरम्यान अधिवास शोधत या उद्यानापर्यंत पोहोचले आहेत. सध्या या उद्यानात पक्ष्यांच्या १२८ जाती, ८२ प्रकारची फुलपाखरे तर ३२ साप आढळतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पाऊल ठेवता क्षणी बाहेरच्या वातावरणातील आणि उद्यानाच्या वातावरणातील फरक जाणवतो. या दोन्ही तापमानामध्ये सुमारे ५ अंश सेल्सिअसचा फरक असतो. या उद्यानात केवळ शोभेसाठी झाडे लावलेली नाहीत. ही झाडे समजावून देण्यासाठी तज्ज्ञ सज्ज असतात. फुले, फळे, त्यांचा फुलण्याचा काळ, त्याचा उपयोग, झाडाच्या सालीचा उपयोग, औषधी झाडांचे उपयोग अशी संपूर्ण माहिती देण्यात येते. एवढेच नाही तर त्या झाडावर कोणते पक्षी, फुलपाखरे येतात हेदेखील सांगितले जाते.
कसे जाल? –
मध्य रेल्वे मार्गावरील सायन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकावरून येथे रिक्क्षाने अथवा बसने पोहोचता येते.
कर्नाळा पक्षी अभयारण्यरायगड जिल्ह्य़ातील पनवेल तालुक्यात असलेले व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्याला खेटूनच गेला आहे असे महाराष्ट्रातले एकमेव पक्षी अभयारण्य. कर्नाळा किल्ला परिसरातील दाट जंगलात पक्ष्यांच्या तब्बल १५० हून अधिक प्रजाती आढळतात. त्याशिवाय हिवाळ्याच्या मोसमात ३७ नव्या प्रजातीही काही काळापुरत्या येथे स्थलांतर करतात. पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्यांना खंडय़ा, पंचरंगी पोपट, हिरवा तांबट, मोर, कालशीर्ष कांचन, ससाणा इत्यादी तसेच इतर अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन येथे घडू शकते. येथे पक्ष्यांसाठी ११ पक्षीघरे असून स्थानिक नसलेले दुर्मीळ पक्षी या ठिकाणी पाहावयास मिळतात.
कसे जाल? –
जवळचे रेल्वे स्थानक – पनवेल. मुंबई-पनवेलवरून पेण अलिबाग महाडकडे जाणाऱ्या बसेस कर्नाळ्यास थांबतात. शनिवार-रविवारी पनवेलवरून कर्नाळा अभयारण्यासाठी खास एस.टी. बसेस सुटतात.
ग्लोबल विपश्यना पॅगोडा
तब्बल ३२५ फुटांची उंची आणि २८० फुटांचा व्यास असलेला हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. हे स्मारक २.५ दशलक्ष टनांच्या जोधपूर स्टोनपासून तयार केले असून इंटरलॉकिंग दगडांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची उभारणी करण्यात आली आहे. तसेच हे बांधकाम अनंतकाळपर्यंत टिकावे म्हणून त्यात सिमेंट किंवा पोलाद या बांधकामातील पारंपरिक वस्तू वापरण्यात आलेल्या नाहीत. भारतातीलच नव्हे तर संबंध जगातील हजारो लोक दर वर्षी विपश्यनेला येतात. म्यानमार सरकारकडून भेट म्हणून प्रदान करण्यात आलेला अत्यंत भव्य असा ६० टनांचा बसलेल्या बुद्धाचा पुतळाही येथे आहे. हा २१ फूट उंचीचा पुतळा एकाच संगमरवरी दगडातून कोरलेला असून तो देशातील सर्वात मोठा गौतम बुद्धांचा पुतळा मानला जातो. तसेच प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी विपश्यना पॅगोडासाठी रंगविलेली बुद्ध चित्रावली ही प्रसंगचित्रे प्रत्येकाने पाहावीच अशी आहेत. मनशांती आणि आत्मिक समाधानासाठी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी.
कसे जाल? –
ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई जवळ मुंबईच्या नर्ऋत्येला आहे. बोरिवली रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकात उतरून गोराई खाडीला जाणारी बस पकडावी. तेथून पॅगोडाला जाण्यासाठी फेरी बोटची सोय उपलब्ध आहे. गाडीने जायचे असल्यास मीरा रोड येथून शिवाजी पुतळ्याच्या चौकातून काशिमिरा माग्रे जाता येते.
कणकेश्वर शंकराचे स्वयंभू देवस्थान
शंकराचे स्वयंभू िलग असलेल्या कणकेश्वर देवस्थानचा इतिहास पुरातन आहे. कणकेश्वर शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अलिबाग शहरापासून पंधरा ते वीस किमी अंतरावर हे स्थळ आहे. या डोंगरावर तेजस्वी सुवर्ण असा जांभा दगड आहे. आणि या जांभा दगडाचे शिविलग आहे. सुंदर कलाकृतीसुद्धा पाषाणावर कोरलेली पाहायला मिळतील. मंदिराच्या मागच्या बाजूला संपूर्ण जांभा दगडाने बांधलेली मोठी आणि सुंदर अशी पोखरण आहे. त्यामध्ये बाराही महिने पाणी असते. जवळजवळ पाच हजार फूट उंचीवर असेलेल्या या स्थळी वातावरण नेहमी थंड असते.
कसे जाल? –
अलिबाग शहरापासून पंधरा ते वीस किमी अंतरावर हे स्थळ आहे. भाविकांना जाण्या-येण्यासाठी वाहनांची सोय आहे.
बेस्ट संग्रहालय
आणिक डेपो येथे हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये बेस्ट बसचा संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला आहे. ज्या वेळी बेस्टने (बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय एॅण्ड ट्रान्स्पोर्ट) बस आणि ट्राम वाहतुकीचा ताबा मिळवला त्या काळापासूनच्या घडामोडी या संग्रहालयात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. १९४७ पासून बेस्ट बसमध्ये झालेले बदल या संग्रहालयातून पाहायला मिळणार आहेत. बेस्टचा उगम ते बसची िवटेज स्टाइल याचा इतिहास या संग्रहालयामुळे जिवंत झाला आहे. बेस्ट बसची आठवण म्हणून संग्रहालयाच्या बाहेर ब्रिटिशकालीन घडय़ाळ लावण्यात आले आहे. आणिक डेपोच्या तिसऱ्या मजल्यावर हे संग्रहालय आहे. बेस्ट बसची जुन्या काळातील तिकिटेही या संग्रहालयात पाहायला मिळतात. दोन दशकांपासून सुरू असलेले एक आण्याचे तिकीट आणि मासिक, साप्ताहिक पास या दुर्मीळ गोष्टीही या संग्रहालयात जपून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर जुन्या काळांपासून धावत असलेल्या बेस्टच्या बसेस आणि त्यांचे विविध प्रकार यांची छबीही या संग्रहालयात पाहायला मिळते. त्यांच्या प्रतिकृती या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. १९७४ च्या दरम्यान असलेल्या ट्राम ते डबलडेकर बस अशी स्थित्यंतरे संग्रहालयाच्या रूपाने जिवंत झाली आहेत. तसेच आजच्या काळातील बसची प्रतिकृतीही या संग्रहालयात पाहायला मिळते.
कसे जाल? –
आणिक आगार, वडाळा, मुंबई</p>
चोर बाजार
दक्षिण मुंबईत वसलेले भेंडी बाजारजवळील चोर बाजार हे जुन्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे. चोरीचा माल या बाजारात विकला जातो अशी आरोळी ठोकली जात असली तरी अनेक अँटिक गोष्टी आपल्याला येथे पाहायला आणि खरेदा करता येतात. येथील अनेक दुकाने अशी आहेत, जिथे पूर्ण दिवस व्यतीत करता येऊ शकतो. जुन्या व पुरातन वस्तूंसाठी अनेक दुकानांचा लौकिक आहे. येथीलच एक मिनी मार्केट नावाच्या दुकानात जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स विकत मिळतात. राणी विक्टोरियाच्या काळातील फíनचर आणि गाडय़ांचे सुटे भागदेखील येथे मिळतात. असं म्हटलं जातं की जर तुमची एखादी वस्तू हरवली असेल तर ती तुम्हाला येथे परत मिळू शकते. अर्थात ती तुमचीच असेल हे सांगणं कठीण आहे.
कसे जाल? –
दक्षिण मुंबईतील भेंडी बाजारजवळ चोर बाजार हे जुन्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे.