नाना पालकर स्मृती समिती
टाटा रुग्णालयाच्या समोर ‘फूटपाथची माझे घर’ मानून उन्हाळा-पावसाळा सहन करणारे कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक महिनोन्महिने येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांत टाटा रुग्णालयाच्या फूटपाथवर हीच परिस्थिती आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तात्पुरता निवारा मिळावा म्हणून १९६७ साली नाना पालकर स्मृती समितीने सीतानिवास इमारतीत चार खोल्यांची जागा मिळवून कर्करुग्णांसाठी निवासगृह सुरू केले. चार खोल्यांच्या जागेवर आता संस्थेची दहा मजली इमारत उभी राहिली आहे. संस्थेच्या ५० वर्षपूर्ती आणि नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांनी सुरू केलेल्या संस्थेच्या कामाचा घेतलेला आढावा.
नाना पालकर स्मृती समिती या संस्थेमार्फत कर्करुग्णांसाठी निवारा, डायलेसिस केंद्र, रक्तपेढी, रुग्णांना आवश्यक साहित्याचे वाटप, पालिका आणि क्षयरुग्णालयात मोफत अन्न आणि फळ वाटप असे अनेक उपक्रम सुरू आहेत. परळ येथे सुरू झालेले संस्थेचे काम बोरिवली, ठाण्यापर्यंतही पोहोचले आहे. विविध भागांतील रुग्णांची आवश्यकता लक्षात घेता या दोन्ही केंद्रातून आरोग्य सेवेचे काम अविरतपणे सुरू आहे.
परप्रांतांतून केमोथेरपी आणि अन्य तपासणीसाठी आलेल्या कर्करुग्णांना टाटा रुग्णालयाच्या आवारात झोपडी बांधून राहावे लागते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गरीब रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत असलेल्या परळ येथील ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या पुढाकाराने हे चित्र काही प्रमाणात तरी पालटले आहे. या संस्थेमार्फत फूटपाथवरील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात येते. एका वेळेस संस्थेत ७५ रुग्ण आणि प्रत्येक रुग्णासोबत दोन नातेवाईक राहू शकतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कमी किमतीत जेवणाची सोयही या संस्थेत करण्यात आली आहे. पाच रुपये नाश्ता आणि दहा रुपये जेवण असल्यामुळे बाहेर वडापाव खाऊन पोट भरणाऱ्या नातेवाईकांना येथे पोटभर जेवण करता येते. टाटा रुग्णालयाच्या आवारातील फूटपाथवर राहणाऱ्या प्रत्येकाला निवारा मिळावा अशी इच्छा असली तरी जागेअभावी जास्त रुग्णांना निवारा देणे शक्य होत नाही. इतर गरजूंना मदत मिळावी यासाठी संस्था किमान एक महिना राहण्याची सोय करते. आताही प्रतीक्षा यादी खूप मोठी असल्याने सर्वच गरजूंना ही संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र जागेअभावी आम्हाला ते शक्य नसल्याचे या संस्थेच्या अलका सावरकर यांनी सांगितले. येथे राहात असताना धूम्रपान आणि दारू पिण्यास बंदी असून यासाठी दररोज खोल्यांची तपासणी केली जाते. कर्करुग्णांसाठी या संस्थेतच योगासनांचे प्रशिक्षण दिले जाते. कुठल्याही आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आणि आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहाराबरोबरच व्यायामाची जोड हवी. यासाठी नाना पालकर संस्थेतर्फे कर्करुग्णांसाठी मोफत योगासने शिबीर चालविले जाते.
पालिका रुग्णालयात अन्नवाटप
पालिका रुग्णालय, क्षय रुग्णालय येथे विविध राज्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. घर-रोजगार सोडून आलेल्या या रुग्णांना मदतीचा हात म्हणून नाना पालकर स्मृती समितीमार्फत मुंबईतील केईएम, शीव, क्षय रुग्णालय शिवडी येथील रुग्णांना मोफत अन्न पुरविले जाते. तर त्यांना फळवाटपही केले जाते. वाडिया रुग्णालयात मूल जन्माला आल्यानंतर मुलाची काळजी करण्यात कुटुंबीय व्यस्त असतात. अशा वेळी मुलाच्या आईला चांगला पोषण-आहार मिळावा यासाठी फळे आणि पौष्टिक अन्नपदार्थ वाडिया रुग्णालयात पाठविले जाते. प्रत्येक रुग्णालयात जाणाऱ्या अन्नपदार्थाचा दर्जा तपासून घेतला जातो.
ठाणे आणि बोरिवलीत सुरू असलेल्या शाखेमार्फतही बरेच काम सुरू आहे. ठाण्याजवळील येऊर परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाडय़ातील कुपोषित मुलांसाठी पोषक आहार पाठविला जातो. दररोज शक्य नसल्याने आठवडय़ातून दोन ते तीन दिवस हा उपक्रम राबविला जातो. तर बोरिवलीतील शाखेमध्ये रुग्णांसाठी लागणारे साहित्य अगदी कमी दरात पुरविले जाते. रुग्णाच्या कुटुंबीयांची परिस्थिती बेताची असेल तर हे रुग्णसाहित्य मोफत दिले जाते. पाच-दहा रुपयात व्हीलचेअर, हॉस्पिटल बेड आदी साहित्य गरजू रुग्णांना पुरविले जाते. या केंद्राला जोडूनच गेल्या वर्षी ‘उत्तरायण’ हा ज्येष्ठ नागरिकांची दिवसभर काळजी घेणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पती-पत्नी दोघेही दिवसभर नोकरीनिमित्ताने बाहेर असणाऱ्या कुटुंबात लहान मुलांप्रमाणे घरातील ज्येष्ठांची देखभाल हीदेखील एक मोठी समस्या असते. मात्र ठाण्यातील या शाखेला ज्येष्ठांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बोरिवलीत मोतीबिंदू केंद्र सुरू करण्यात आले असून येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते.
गेल्या ५० वर्षांत नाना पालकर संस्थेने मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याच्या मदतीने अनेकांना उभे राहण्याचे बळ मिळाले आहे. सध्या या संस्थेचा कारभार डॉ. हर्षद पुंजानी आणि अलका सावरकर सांभाळत आहेत. येत्या काही वर्षांत गरीब रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याची संस्थेची इच्छा आहे.
गोखले डायलिसिस केंद्र
* २००४ साली नाना पालकर या संस्थेत डायलिसिस केंद्र सुरू झाले. गेल्या वर्षांपर्यंत येथे डायलिसिस केंद्रासाठी ३५० रुपये घेतले जात होते. मात्र संस्थेच्या मदतनिधीत वाढ झाल्याने या वर्षांपासून संस्थेने मोफत डायलिसिस सेवा सुरू केली आहे. या डायलिसिस केंद्रात आदिवासी भागातील मुलींना प्रशिक्षण देऊन रुजू करण्यात आले आहे.
* रक्तपेढी कर्करुग्णांना निवारा आणि डायलिसिस केंद्र सुरू केल्यानंतर नाना पालकर स्मृती समितीने रुग्णांसाठी रक्तपेढी सेवा सुरू केली आहे. येथे गरीब रुग्णांना कमी दरात रक्त तपासणी करता येते. दरवर्षी तीन वेळा रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. यातून मिळालेले रक्त टाटा आणि केईएम रुग्णालयांना दिले जाते.
दहा रुपयांत उपचार
टाटा रुग्णालयाजवळ डॉ. शैला लवेकर यांनी स्वत:च्या दवाखान्याची जागा नाना पालकर स्मृती समितीला सुपूर्द केली आहे. त्यामुळे तेथे १० रुपयांमध्ये उपचार देणारा नवा दवाखाना संस्थेच्या मदतीने सुरू केला आहे. सकाळी आणि सायंकाळी दोन तास सुरू असलेल्या दवाखान्यात गरिबांना कमी किमतीत उपचार दिले जातात. उपचारानंतर रुग्णांना औषधांसाठी जास्त खर्च करावा लागू नये यासाठी जेनेरिक औषधांचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून रुग्णांना अगदी कमी दरात औषधे उपलब्ध होतात.
मीनल गांगुर्डे meenal.gangurde8@gmail.com