संकल्प

नशेच्या आहारी गेल्याने घरच्यांनीही नाकारलेल्या मुंबईच्या रस्त्यावरील लोकांसाठी ‘संकल्प रिहॅबिलिटेशन ट्रस्ट’ हा एकमेव आधार आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करत असल्याने एड्स, क्षयरोग आणि हिपेटाईटिस-सी या रोगांना बळी पडणाऱ्यांना नवीन आयुष्य जगण्याची संधी देणाऱ्या संकल्प संस्थेला नुकतीच २३ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने..

अंगावर कळकट्ट कपडे, वाढलेले केस, शरीराला येणारा दुर्गंध अशा अवस्थेत रस्त्यावर कोपऱ्यात नशा करून पडलेल्या व्यक्ती पाहिल्या की किळस वाटते. परंतु या व्यक्तींवर केवळ औषध उपचारच नव्हे तर त्यांना आपलेसे करून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारणारी संकल्प ही एकमेव संस्था आहे.

मुंबईमध्ये उड्डाणपूल, रेल्वे रूळ, गटाराशेजारी वास्तव्य करणारे हे गर्दुल्ले बहुतांश वेळा इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करीत असतात. नशा करताना एकाच सुईचा वापर अनेक जण अनेक वेळा करत असल्याने यांच्यामधील बहुतांश लोक हे एड्स आणि ‘हिपेटाईटिस-सी’ या आजारांनी ग्रस्त असतात. अशा वेळी ज्या लोकांना या आजारातून आणि नशेच्या दुनियेतून बाहेर पडण्याची इच्छा असते, त्यांना औषध उपचारांसह समुपदेशन आणि आधार देण्याचे महत्त्वाचे काम ‘संकल्प’च्या माध्यमातून करण्यात येते.

एड्स आजारावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने एल्डर्ड टेलिस यांनी १९९५ मध्ये ‘संकल्प’ची स्थापना केली. नशेच्या आहारी गेलेल्यांचे आयुष्य काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या टेलिस यांनी नशेमधून स्वत:ची त्यातून सुटका केली. त्यानंतर जागतिक आरोग्य केंद्राच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जगभरात त्यांनी नशा, क्षयरोग, एड्स अशा विविध विषयावर काम केले. बाहेरील देशातील लोकांना नशेतून बाहेर पडण्यासाठी मदत करीत असतानाच मुंबईच्या रस्त्यावरील लोकांसाठी मात्र कोणीच काम करीत नाही, याचं दु:ख त्यांना सतत बोचत होते. यातूनच त्यांनी ‘संकल्प रिहॅबिलिटेशन ट्रस्ट’ची स्थापना केली. ताडदेव येथील छोटय़ाशा जागेत सुरू झालेल्या संस्थेचा विस्तार होत आजघडीला वसई येथे नशामुक्ती केंद्र, भिवंडी, विठ्ठलवाडी, जीटीबी आणि मुंबई सेंट्रल येथे ड्रॉप इन केंद्र, पुण्यात मुळशी येथे पुनर्वसन केंद्र आणि चर्नी रोड येथे निवारा केंद्र असे शहरभर संस्थेचे जाळे पसरले आहे.

‘ड्रॉप इन सेंटर’

इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करणाऱ्या व्यक्तींना समुपदेशनापासून ते औषध उपचारापर्यंत सर्व सुविधा या केंद्रात दिल्या जातात. तसेच यापैकी संशयित क्षयरोग, एड्स व्यक्तींचे निदान करून त्यांची तपासणी करून घेणे. या तपासणीत आढळून आलेल्या रुग्णांना वेळेवर औषधे देणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून या लोकांना विविध सुविधा एकाच केंद्रात दिल्या जात आहेत.  नशेमधून बाहेर आलेल्या लोकांना नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी संकल्पच्या माध्यमातून अनेक लोकांनी नशेच्या जगातून बाहेर पडून एक नवीन आयुष्य सुरू केले आहे. विशेषत: परराज्यांमधून मुंबईमध्ये वास्तव्यास आलेल्या आणि नशेमध्ये अडकलेल्या अनेक लोकांना संकल्पने पुन्हा त्यांच्या घराकडे परतण्यास मदत केली आहे. यामध्ये बंगाल, कलकत्ता, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू अशा अनेक राज्यांचा समावेश आहे. नशेमधून बाहेर आलेल्या व्यक्तींनाच प्रशिक्षण देऊन या कामामध्ये संकल्पने सहभागी करून घेतले आहे. संकल्पमध्ये कार्यरत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ४० टक्के कर्मचारी हे नशेमधून बाहेर पडून इतरांना नशा सोडविण्यासाठी मदत करत आहेत.

निवारा केंद्र

नशेमध्ये बुडाल्याने अत्यंत गंभीर आरोग्य स्थिती असलेल्या लोकांना रस्त्यावरून आणून एक आसरा देण्यासाठी संकल्पचे निवारा केंद्र नेहमीच कार्यरत आहे. यामध्ये त्यांना औषध उपचारांसह राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाऊन त्यांची काळजी घेतली जाते. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्ती बहुतांश वेळा पैसे मिळविण्यासाठी अनेक गुन्हे करतात. यामुळे गुन्हेगारी जगतामध्ये देखील वाढ होत आहे. तेव्हा या व्यक्तीच्या अडचणी समजून त्यांना नशेमधून बाहेर काढण्यासाठी औषधोपचार करणे, समुपदेशन करणे, कामाच्या नवीन संधी देणे यासाठी संकल्पने पोलिसांसोबत काही ठिकाणी आणि आर्थर रोड कारागृहामध्येदेखील काम केले आहे.

घातक सुया नष्ट

गर्दुल्ल्यांना गाठून मोफत सुई देण्याचे काम ‘संकल्प’चे कर्मचारी करतात. नशा करण्यासाठी म्हणून सुई मोफत दिली जात असली तरी या बदल्यात त्यांच्याकडून वापरलेल्या सुयांचा साठा जप्त करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. अनेकदा वापरल्याने घातक असलेल्या या सुया हे लोक कचऱ्यामध्ये किंवा इतस्तत: कुठेही फेकून देतात. कचरा गोळा करणारे वा अशा भागांमध्ये वावरणाऱ्या इतर लोकांच्या संपर्कात अशा सुया येऊन त्यांनाही रोगाची शक्यता असते.

‘ओएसटी थेरपी’

मुंबई एडस् नियंत्रण केंद्राअंतर्गत इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करणाऱ्या रस्त्यावरील लोकांना औषधोपचार देणारी ‘संकल्प’ ही एकमेव संस्था आहे. यात ‘ओपीईड सबस्टिटय़ुशन थेरपी’ (ओएसटी)च्या माध्यमातून नशा सोडू इच्छिणाऱ्यांसाठी रोज एक गोळी दिली जाते, ज्यामुळे त्यांना नशा करण्याची इच्छा होत नाही. ही थेरपी संकल्पने आजपर्यंत हजारो नशेत बुडालेल्या लोकांना दिली असून ज्यामुळे ते नशेपासून दूर राहू शकले आहेत.

Shailaja486@gmail.com

Story img Loader