मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी दिले. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्याोग-व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल, असे शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा : गर्भाशयाच्या मुखावरील तांबी मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत सरकली, शस्त्रक्रिया करून महिलेची त्रासातून मुक्तता
शेलार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या आढावा बैठकीस सचिव पराग जैन नैनुटिया, ‘महाआयटी’च्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय मिशन’अंतर्गत देशभरात ‘एआय’ क्षमता वाढवण्यासाठी १० हजार ३७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा आदींचा समावेश आहे.