मुंबई : प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील सर्व स्थानके आधुनिक, प्रगत सुविधा आणि माहिती यंत्रणांनी सुसज्ज केली जात आहेत. तिकीट सुविधा, प्रतीक्षालय, बिझनेस – क्लास लाउंज, नर्सरी, स्वच्छतागृह, माहिती कक्ष या सर्व सुविधा स्थानकांवर उपलब्ध होत आहेत. तर, बुलेट ट्रेनच्या एकूण १२ स्थानकांमध्ये ९० सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई – अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव – दमण येथे पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार अशा एकूण १२ स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांची कामे सुरू असून कामांना वेग दिला जात आहे. या स्थानकांमध्ये सरकते जिने बसविण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील सर्वात पहिला सरकता जिना आनंद स्थानकात बसविण्यात आला असून गुजरातमधील ८ स्थानकांत ४८ आणि महाराष्ट्रातील ४ स्थानकांत ४२ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याकरीता सरकत्या जिन्यावर आपत्कालीन थांबा बटण, सरकत्या जिन्याला हँडरेल्स असल्याने प्रवाशांची बोटे त्यात अडकून होणारा अपघात टाळता येणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील पाच स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे. तसेच विविध संकल्पनेवर आधारित महाराष्ट्रातील स्थानके आकार घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infrastructural work at bullet train stations has started mumbai print news amy