३० टक्केच मनुष्यबळ; अनेक प्रकल्पांची उद्दिष्टपूर्ती लांबण्याची शक्यता
सुहास जोशी
शहर आणि महानगर परिसरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अद्यापही मजुरांची प्रतीक्षाच आहे. टाळेबंदीच्या काळात परत गेलेले मोजकेच मजूर परत येत असून अपेक्षित संख्येपेक्षा सुमारे ३० ते ३५ टक्केच कामगार सध्या कार्यरत आहेत. परिणामी कामांची गती मंदावली असून अनेक प्रकल्पांची उद्दिष्टपूर्ती लांबण्याची शक्यता आहे.
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात शहर आणि महानगरातील अनेक मजूर हे शहर सोडून मिळेल त्या वाहनांनी आपल्या मूळ गावी परत गेले. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि महाराष्ट्र रस्ते राज्य विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पावर केवळ एक चतुर्थाश मजूरच शिल्लक राहिले. टाळेबंदी शिथिलीकरणामध्ये उत्तर भारतात परत गेलेल्या काही मजुरांनी रोजगारासाठी पुन्हा मुंबईची वाट धरली. पण हे प्रमाण कमी आहे.
एमएमआरडीएमार्फत सहा मेट्रो मार्गिका प्रकल्प, शिवडी ते चिर्ले-मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, छेडा नगर येथील उड्डाणपूल विस्तार, कलानगर ते वांद्रे वर्सोवा सी लिंक विस्तार उड्डाणपूल अशी कामे सुरू आहेत. मे महिनाअखेर मजुरांची संख्या १६ हजारांवरून साडेतीन हजारांवर घसरली. जून महिन्यात त्यामध्ये अकराशे मजुरांची वाढ झाली, तर जुलै महिन्यात आणखी दोन हजारांची वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) हे दोन प्रकल्प या वर्षअखेर कार्यरत होण्याचे उद्दिष्ट होते, मात्र त्यास आता विलंब होईल.
स्थिती काय?
* गेल्या महिन्यात प्राधिकरणाने केवळ राज्यातील मजुरांसाठी (१६ हजार) थेट कंत्राटदाराकडे भरतीसाठी जाहिरात दिली. त्यानुसार जून महिन्यात राज्यातील केवळ ४६४ मजूरच भरती झाले.
* एमएमआरसीतर्फे कुलाबा ते सीप्झ या ३३.५ किमीच्या संपूर्ण भुयारी मेट्रो ३चे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील मजुरांची संख्या १५ हजारांवरून चार हजार झाली. गेल्या दीड महिन्यांत त्यात केवळ दीड हजारांची वाढ झाली असून सध्या पाच हजार सहाशे मजूर कार्यरत आहेत. हा प्रकल्प २०२१ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
* एमएसआरडीसीतर्फे नुकतेच वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम डिसेंबरमध्ये सुरू झाले. सध्या हे केवळ जमिनीवरीलच काम सुरू असून, अद्याप समुद्रातील कामाला सुरुवात झाली नाही.
* टाळेबंदीच्या काळात काम बरेच रखडले असून येथील अपेक्षित मजुरांची संख्या दीड ते दोन हजारच्या घरात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ १४५ मजूरच कार्यरत असून काम पुढे नेण्यात अडचणी येत आहेत.