मुंबई : सामाईक प्रवेश परीक्षांसाठी सराव चाचणी (मॉक टेस्ट) आणि शिक्षणातील आपला कल ओळखण्यासाठी संज्ञानात्मक क्षमता मूल्यांकन (सायकोमेट्रिक टेस्ट) विद्यार्थ्यांना करता यावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत ‘सीईटी-अटल’ हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) महाविद्यालयांमध्ये आकर्षक सत्रांचे आयोजन करण्याबरोबरच माहिती पत्रिका वितरण आणि सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांवर जाहिराती करण्यावर भर दिला आहे.
विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करता यावी आणि पुढील करिअरसंबंधाने सूज्ञतेने निर्णय घेता यावा यासाठी आवश्यक ते सहाय्य आणि साधने उपलब्ध करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे सुरू केलेल्या ‘सीईटी अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दीड महिन्यांत या उपक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ‘सीईटी-अटल’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक सक्रियता मोहीम सुरू करण्याची घोषणा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केली.
सीईटी कक्षाने अमरावती, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, ठाणे आणि औरंगाबाद येथील प्रमुख महाविद्यालयांमध्ये आकर्षक सत्रांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना किओस्कच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि माहिती पत्रकांच्या वितरणाद्वारे माहिती देण्यात येत आहे. तसेच अमरावती, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर, बीड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये ९०० हून अधिक ऑटोरिक्षांचा ताफा आणि ठाणे, नाशिक, नागपूर, सातारा, सांगली आणि लातूर येथे मोबाइल व्हॅनद्वारे जाहिरात करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० बसच्या माध्यमातून जाहिरात करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सराव चाचणी आणि सायकोमेट्रिक मूल्यांकनांसाठी नोंदणी करता यावी यासाठी क्यूआर संदेशन प्रणालीही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी करता यावी आणि आत्मविश्वासाने सामाईक प्रवेश परीक्षेला सामोरे जाण्यास सक्षम करण्यासाठी सराव चाचणी आणि सायकोमेट्रिक मूल्यांकन साधनांचे जागतिक दर्जाचे प्रारूप तयार केले आहे. विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती प्रभावीपणे पोहचवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार. – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री