शैलजा तिवले
औषध विक्रीसाठी प्रिस्क्रिप्शन (औषधचिठ्ठी) देणे बंधनकारक असल्याने त्यातून पळवाट शोधत कोणत्याही डॉक्टरांकडून अवैध औषधचिठ्ठी तयार करण्याचा कारभार नेटमेड, मेडलाइफ यांसारख्या ई-फार्मसी संकेतस्थळांनी सुरू केला आहे. रुग्णाला न तपासताच बेकायदा औषधचिठ्ठी देणाऱ्या डॉक्टरांच्या संगनमताने हा कारभार सुरू असून या प्रकाराचा सध्या ऑनलाइन औषधविक्री संकेतस्थळावर सुळसुळाट झाला आहे.
ई-फार्मसी म्हणजेच ऑनलाइन औषधविक्रीला अजून देशामध्ये कायदेशीर मान्यता नाही. तरीही नेटमेड, मेडलाइफ यांसारख्या संकेतस्थळांनी प्रिस्क्रिप्शन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून औषधविक्री सुरू केली आहे. औषधचिठ्ठी दाखवूनच औषधे देणे बंधनकारक आहे. मात्र ई-फार्मसीच्या माध्यमातून नफा कमावण्यासाठी या संकेतस्थळांनी पळवाट शोधून काढली आहे.
‘लोकसत्ता’ने नेटमेडस् (डॉट) कॉम या संकेतस्थळावरून झोसेफ(अॅन्टिबायोटिक), अॅमिटोन (अॅन्टीडिप्रेसंट), स्टिरॉइडयुक्त बेटनोव्हेट सी (क्रीम) ही औषधे मागविली. या औषधांमधील अॅमिटोन हे औषध अॅन्टीडिप्रेसंट म्हणजेच नैराश्यावर दिले जाणारे असून प्रिस्क्रिप्शननेच देणे बंधनकारक आहे. बेटनोव्हेट सी ही स्टिरॉइडयुक्त क्रीम असून ही देखील प्रिस्क्रिप्शनशिवाय देणे कायदेशीर गुन्हा आहे. तरीही या औषधांचे बेकायदेशीर प्रिस्क्रिप्शन या संकेतस्थळावर डॉक्टरांच्या संगनमताने केले जात आहे.
प्रिस्क्रिप्शन नसल्याचे नमूद केल्यानंतर तासाभरातच समोरून डॉक्टरांचा फोन आला. त्यांनी कोणती औषधे हवी आहेत, अशी विचारणा केली. वरील औषधे सांगितल्यानंतर त्यांनी अॅमिटोन ही गोळी कधीपासून आणि कशासाठी घेत असल्याची विचारणा केली आणि फोन ठेवला. त्यानंतर तासाभरातच बोलणे झालेल्या डॉक्टरांचे नाव आणि संगणकीय सहीसह प्रिस्क्रिप्शन संकेतस्थळावर उपलब्ध झाले. वर नमूद केलेल्या तिन्ही औषधांची नावे या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेली होती. पुढील चार दिवसांतच ही औषधे नमूद केलेल्या पत्त्यावर प्राप्तदेखील झाली. अशा रीतीने कोणत्याही तपासणीशिवाय बेकायदेशीररीत्या डॉक्टरांच्या नावाने प्रिस्क्रिप्शन तयार करण्याचा धंदाच या ई-फार्मसीच्या नावे सुरू केला आहे.
ई-फार्मसीच्या काही संकेतस्थळांनी तर ‘डॉक्टरअॅप’ नावाच्या संकेतस्थळासोबत जोडून घेतले आहे. त्यामुळे डॉक्टरअॅपशी जोडलेल्या कोणत्याही डॉक्टरशी केवळ संवाद साधून औषधांचे प्रिस्क्रिप्शन ही संकेतस्थळे तयार करीत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अगदी स्टिरॉइड असलेल्या क्रीमसह, नैराश्यावरील औषधे आणि अॅन्टिबायोटिक अशा सर्व प्रकारच्या औषधांची अवैध प्रिस्क्रिप्शन तयार केली जातात.
अशा रीतीने या संकेतस्थळांवर अवैध प्रिस्क्रिप्शन केली जात असतील ते बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला संकेतस्थळ किंवा अॅपविरोधात कारवाई करण्याचे अधिकार नाहीत, मात्र अशा रीतीने जे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देत असतील, त्या डॉक्टरांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल
-डॉ. शिवकुमार उत्तरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यक परिषद