मुंबई : स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांसाठी शारीरिक वेदनांसह स्तन काढून टाकण्याचा निर्णय मानसिक तणाव वाढवणारा असतो. मात्र, आता अनेक नव्या उपचार पद्धतींमुळे स्तन काढून न टाकताही कर्करोगावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे महिलांच्या शारीरिक ठेवणीत बदल होत नाहीत. नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटरने ‘रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी टीलूप’ या नवीन शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करून दिला असून रुग्णालयाने महाराष्ट्रीतील पहिली रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी टीलूप रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया जानेवारी महिन्यात करण्यात आली.

स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये स्तन संरक्षण शस्त्रक्रिया हा एक प्रमुख भाग असतो. त्यासाठी ऑन्कोप्लास्टी हा पर्याय सध्या उपलब्ध आहे. मात्र तरीही अनेक महिलांची मास्टेक्टॉमी (पूर्ण स्तन काढून टाकावा लागणे) शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेत स्तनाग्राजवळ चीर दिली जाते. यंत्रमानवाच्या सहाय्याने (रोबोटिक) स्तनाग्र काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेतही अशाच स्वरूपाची पद्धत वापरली जाते. परंतु खूपच लहान चीर दिल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका टळतो. या शस्त्रक्रियेनंतर ऑटोलॉग्स टिश्यू (सामान्यत: पोटातील चरबी किंवा पाठीचा भाग) वापरून स्तन पूर्वस्थितीत आणले जातात. मात्र, ‘रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी टीलूप’ या शस्त्रक्रियेत मास्टेक्टॉमी न करता त्याजागी टीलूप जी टायटॅनियमचे आवरण असलेली पॉलीप्रॉपिलीनची जाळी स्तनाच्या जागी बसवली जाते त्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये कोणतेही बदल दिसून येत नाहीत.

दरम्यान, स्तानाच्या कर्करोगावर उपचार घेत असलेल्या महिलांना स्तन किंवा स्तनाग्र गमावणे अनेकदा न्यूनगंड निर्माण करते. त्यामुळे अनेकदा भावनिक ताणतणावांचा सामना स्त्रीला करावा लागतो. कर्करोग रुग्णांची शारीरिक व्याधी बरी होण्याच्या प्रवासात, उपचारांत रुग्णाचे मनस्वास्थ्यही महत्वाचे असते. स्तनाग्र वाचवण्याच्या रोबोटिक मास्टेक्टॉमी टीलूपमध्ये शारीरिक बदलाची चिंता कमी होते. त्यामुळे महिलांचा तणाव काहीप्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच या शस्त्रक्रिया तुलनेने कमी वेदनादायी आहे.

महाराष्ट्रात टीलूपसह केलेली रोबोटिक शस्त्रक्रियेकडे फक्त पुढील एक तांत्रिक पाऊल किंवा फक्त नवे तंत्रज्ञान म्हणून पाहणे योग्य नाही. ही उपचारपद्धती स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांतील एक महत्वाचे पाऊल आहे. कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांना समजून घेऊन ते अंमलात आणणे महत्वाचे आहे. या शस्त्रक्रियेमुळे महिलांचे शारिरीक तसेच मानसिक संतुलन राखले जाते. तसेच शस्त्रक्रियेनंतरही गुंतागुंत टाळता येते, असे अपोलो कॅन्सर सेंटरच्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागातील वरीष्ठ चिकित्सक डॉ. सुरेश एच अडवाणी यांनी सांगितले.

Story img Loader