उमाकांत देशपांडे
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली असून शिवसेनेमागे अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौकश्यांचे शुक्लकाष्ठ मागे लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत किंवा माजी मुख्य सचिवांमार्फत काही प्रकरणांमध्ये खुली चौकशी होईल. तर काही प्रकरणात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे याचिकाही सादर होतील, असे वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले.
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या २५ वर्षांत शेकडो प्रकरणांमध्ये सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याबाबतचे आरोपपत्र भाजप तयार करीत आहे. भाजपने १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले असून त्याबाबत रणनीती ठरविण्यासाठी मुंबई भाजपची दोन दिवसीय बैठक गुरुवार व शुक्रवारी उत्तन येथे झाली, अशी माहिती मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. या बैठकीत निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करणे, आरोपपत्र निश्चित करणे, प्रत्येक प्रभागात निवडणूक केंद्रनिहाय (बूथ) नियुक्त करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांची रचना व कामे, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी घ्यावयाचा आढावा आदींबाबत विस्तृत चर्चा झाली. निवडणुका कधी होणार, हे निश्चित झाल्यावर जनतेला भाजपकडून कोणते निर्णय व प्रकल्पांची अपेक्षा आहे, त्याबाबतच्या सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यावर विचार करून पक्षाचा जाहीरनामा ठरविला जाणार आहे.
हेही वाचा >>> पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी प्रवृत्ती ठेचा; भाजप-मनसेची मागणी
शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून रान उठविण्याची जबाबदारी मुंबईतील तीनही खासदार व आमदारांवर देण्यात आली आहे. करोना रुग्णालय उभारणीतील गैरव्यवहार, रस्त्यांचे डांबरीकरणातील गैरव्यवहार, भगवती रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणातील गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे भाजपने तयार केली आहेत. शहर व उपनगरात अनेक टॉवर्सना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टँकरलॉबीला सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असून शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार या माध्यमातून होत आहे. त्यामुळे अशा काही प्रकरणांची खुली चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. ही चौकशी माजी न्यायमूर्ती किंवा मुख्य सचिवांमार्फत होईल. शिवसेनेमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्याबरोबरच न्यायालयांमध्ये काही प्रकरणे दाखल करून अडचणीत आणले जाणार आहे.
भाजपचे खासदार व आमदार पत्रकार परिषदा आणि जनतेमध्ये जाऊन वेगवेगळय़ा प्रकरणांमध्ये आरोपांची राळ उठवून चौकश्यांची मागणी महापालिका आयुक्त आणि संबंधितांकडे करणार आहेत. याबाबतची रणनीती तयार करण्यात येत असल्याचे भाजप सूत्रांनी नमूद केले. महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे गट युतीने लढणार असून १५० जागांचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. प्रभागरचनेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर निर्णय झाल्यावर कोणाकडे किती व कोणत्या जागा असतील, यावर निर्णय घेतला जाणार आहे. पण भाजप किंवा शिंदे गटाने जिंकलेल्या आणि अतिशय कमी मतांनी हरलेल्या जागा त्यांच्याकडे राहतील. उर्वरित जागांमध्ये भाजपचा वरचष्मा राहील, असे वाटप होणार आहे. मनसे मुंबईत १०० हून अधिक जागी उमेदवार उभे करून शिवसेनेची मते फोडण्यासाठी छुपे सहकार्य करणार आहे. त्याबदल्यात मनसेच्या विजयाची शक्यता असलेल्या प्रभागांमध्ये भाजप किंवा शिंदे गट उमेदवार देणार नाही किंवा अगदी कमकुवत उमेदवार दिला जाईल, असा छुपा समझोता करण्यात आला आहे. शिवसेनेविरोधात रान उठविण्यासाठी मनसे भाजपला मदत करण्याची भूमिका घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.