नौदलाने गेल्या काही वर्षात कात टाकली असून विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी ही देशातील विविध डॉकयॉर्डमध्ये युद्धपातळीवर सुरु आहे. चीनचे समुद्रातील वाढते वर्चस्व आणि युद्धनौकांचा संचार, भारताच्या जवळ समुद्रातील जलवाहतूक आणि वाढता व्यापार लक्षात घेता भारतीय नौदलाच्या ताफ्यात विविध युद्धनौकांचा समावेश गेल्या काही वर्षात वेगाने होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचाच एक भाग म्हणून विशाखापट्टनम वर्गातील (Visakhapatnam class destroyer) तिसरी युद्धनौका आयएनएस इम्फाळ ( INS Imphal) आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. या निमित्ताने मुंबईत झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत इम्फाळ युद्धनौकेवर पहिल्यांदाच नौदलाचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. याआधीच गेल्या दोन वर्षात विशाखापट्टनम वर्गातील आयएनएस विशाखापट्टनम आणि मोरमुगाओ या दोन विनाशिका प्रकारातील युद्धनौका दाखल झाल्या आहेत. इम्फाळमुळे नौदलाच्या संचार आणि मारक क्षमतेत मोलाची भर पडली आहे.

हेही वाचा… जगदंबेचा उल्लेख करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले “भारतीय नौदलाच्या वाढत्या ताकदीमुळे… “

इम्फाळ नेमकी कशी आहे?

Visakhapatnam वर्गातील युद्धनौकांप्रमाणेच INS Imphal ची रचना आहे. या युद्धनौकेची एकूण लांबी १६३ मीटर असून वजन तब्ब्ल सात हजार ४०० टन एवढे आहे. खोल समुद्रात ही युद्धनौका जास्तीत जास्त ३० nautical miles म्हणजेच ताशी ५६ किलोमीटर या वेगाने संचार करु शकते. इंधन भरल्यावर एका दमात १५ हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे. इम्फाळवर एका वेळी ५० अधिकारी आणि २५० नौसैनिक कार्यरत असतील.

हेही वाचा… Maharashtra News Live: “राहुल गांधी भाजपासाठी वरदान”, देवेंद्र फडणवीसांचा टोला!

वेध घेण्याची क्षमता

इम्फाळवर सर्वात महत्त्वाचे असे EL/M-2248 MF-STAR नावाचे शक्तीशाली रडार आहे. यामुळे सर्व बाजूंना समुद्राच्या पृष्ठभागावर ३०० किलोमीटर अंतरावरील हालचाल सहज टिपता येणार आहे. तसंच विविध प्रकारच्या रडारमुळे ४०० किलोमीटर अंतरावरुन हवेतून येणारं लक्ष्यावर नजर ठेवण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे. ७० किलोमीटर अंतरावरील हवेतील कोणतेही लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेले Barak 8 क्षेपणास्त्र यावर तैनात आहे. तर ३०० किलोमीटर अंतरावरील समुद्रातले किंवा जमिनीवरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेले BrahMos ही युद्धनौकेवरील प्रमुख शस्र आहे. तसंच पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्रे, पाणतीर, अगदी जवळ आलेल्या लक्ष्याला भेदणारी प्रणाली यावर तैनात आहे.

इम्फाळची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये झाली असून याच वर्गातील INS Surat पुढील वर्षाच्या शेवटी नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल अशी अपेक्षा आहे. तर Nilgiri वर्गातील सातपैकी पहिली युद्धनौका २०२४ च्या मध्यात नौदलात दाखल होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ins imphal commissioned into the navys fleet strength and defence capabilities of indian navy increased asj