कलवरी वर्गातील पाणबुड्यांमध्ये आता आणखी एका पाणबुडीची भर पडली आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात INS Vagir ही पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात गस्त घालत लक्ष ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
माझगाव डॉकयार्डने केली बांधणी
मुंबईत माझगाव डॉकयार्ड कलवरी मार्गातील पाणबुड्यांची निर्मिती करत आहे. डॉकयार्ड बांधलेल्या कलवरी, खंदेरी, करंज आणि वेला अशा चार पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या होत्या. आता यामध्ये INS Vagir च्या रुपाने पाचव्या पाणबुडीची भर पडली आहे. सहावी आणि कलवरी वर्गातील शेवटची पाणबुडी वगशीर INS Vagsheer पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या सुरु असून एप्रिल २०२४ मध्ये अखेरपर्यंत ती नौदलात दाखल होईल असा अंदाज आहे.
INS Vagir ची वैशिष्ट्ये काय?
या पाणबुडीची लांबी सुमारे ६७ मीटर असून उंची १२ मीटर एवढी आहे, एकुण वजन सुमारे १७०० टन एवढे आहे. कलवरी वर्गातील इतर पाणबुड्यांप्रमाणे ही पाणबुडीही डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर कार्यरत रहाते. एका दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करु शकते, समुद्रात जास्तीत जास्त ५० दिवस सलग संचार करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. पाण्याखालील लक्ष्याचा भेद करण्यासाठी पाणतीर (torpedo) तर पाण्यावरील किंवा जमिनीवरील लक्ष्याला भेदण्यासाठी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. या पाणबुडीच्या बांधणीला नोव्हेंबर २०२० मध्ये सुरुवात झाली होती, डिसेंबर २०२२ ला तीचे जलावतरण झाले होते.
हेही वाचा… बाळासाहेबांच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगणारा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंची आदरांजली
नौदलाची ताकद वाढली
देशाच्या तिन्ही बाजूला अथांग समुद्र असून या भागातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरु असते. तसंच एका बाजूला पाकिस्तान खास करुन दुसऱ्या बाजूला असलेल्या चीन नौदलाचा भारताजवळच्या समुद्रातील वावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भारताला Vagir सारख्या पाणबुड्यांची आवश्यकता आहे. Vagir च्या समावेशामुळे समुद्रात संचार आणि वर्चस्व ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत मोलाची भर पडली आहे.