युद्धनौकेचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारची तयारी
गेली २८ वर्षे भारतीय नौदलाच्या सेवेत असलेली आणि २००९ साली सुवर्ण महोत्सव साजरा केलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका २०१७ साली भारतीय नौदलातून निवृत्त होणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या युद्धनौकेचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ‘आयएनएस विक्रांत’बाबत अशीच उत्सुकता दाखविली होती; पण तब्बल १७ वर्षांनंतर ती भंगारात काढावी लागली. या पाश्र्वभूमीवर ‘विराट’च्या भागधेयात तरी संग्रहालय आहे का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
१८ डिसेंबर १९५९ रोजी ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये दाखल झालेली ‘एचएमएस हर्मिस’ ही युद्धनौका भारताने १९८७ साली खरेदी केली आणि तिचे नामकरण ‘आयएनएस विराट’ असे करण्यात आले. ब्रिटन सरकारशी झालेल्या करारापूर्वी इटलीच्या गॅरिबाल्डी वर्गातील युद्धनौकेची खरेदी करण्याची तयारीही भारतीय नौदलाने केली होती. मात्र नंतर ‘एचएमएस हर्मिस’वर शिक्कामोर्तब करण्यात आले. ब्रिटनमधील डेव्हनपोर्ट गोदीमध्ये त्या युद्धनौकेची डागडुजी करण्यात आली. त्यावरील यंत्रणा बदलण्यात आल्या आणि ती युद्धनौका ‘आयएनएस विराट’ या नावाने १२ मे १९८७ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी ‘आयएनएस विराट’वर स्कीजंपची रचना करण्यात आली होती. त्यानंतर आजवर तब्बल २८ वर्षे ‘विराट’ सेवेत आहे, तर तिच्या निर्मितीपासून तिने तब्बल ५८ वर्षे सेवा बजावली आहे. एवढी दीर्घकाळ सेवा बजावणारी ती जगातील एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे.
भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ १९९७ साली नौदलातून निवृत्त झाली तेव्हा तिच्यावर संग्रहालय करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, संरक्षण मंत्रालयाने ती युद्धनौका महाराष्ट्राला भेटही दिली. मात्र महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे यंदाच्या वर्षी ती भंगारात काढण्याचा निर्णय नौदलाला घ्यावा लागला.
यापुढे युद्धनौका राज्याला द्यायचीच असेल तर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची हमी घेऊनच त्याबद्दलचा निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा अनेक ज्येष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आयुष्य वाढविणेही कठीण
सर्वसाधारणपणे युद्धनौकांचे वय हे २० ते २५ वर्षांचे असते. विराटचे सुरुवातीचे आयुष्यमान २५ वर्षांचेच होते. भारतीय नौदलाने १९९९ साली तिचे आयुष्यमान वाढवले. त्यानंतर २००९ साली पुन्हा एकदा डागडुजी करून तिचे आयुष्यमान वाढविण्यात आले. आता मात्र तिचे आयुष्यमान वाढविण्याच्या शक्यताही संपुष्टात आल्याने तिला येत्या २ वर्षांत निवृत्त करणे भाग आहे. तसा निर्णयही नौदलाने घेतला आहे.

Story img Loader