सेव्हनहिल्स रुग्णालयातील पाहणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैलजा तिवले

मुंबई : अंधेरीतील सेव्हनहिल्स रुग्णालयात तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झालेल्या १३९ रुग्णापैकी सुमारे ४५ टक्के रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते. परंतु अनियंत्रित मधुमेह, गंभीर फुप्फुसांचे आजार असे दीर्घकालीन आजार असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. मृतांमध्ये ८० टक्के ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे या वयोगटातील आणि जोखमीच्या गटातील व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले तरी प्रतिबंधात्मक मात्रा घेणे गरजेचे असल्याचे यावरून निदर्शनास आले आहे.

 मुंबईत १ डिसेंबर ते १८ जानेवारी या काळात सेव्हन हिल्समध्ये ४,२५६ रुग्ण उपचारासाठी दाखल केले असून यातील १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाचा मृत्युदर सुमारे तीन टक्के असून या मृत्यूचे विश्लेषण पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मुंबईत गंभीर प्रकृतीच्या सर्वाधिक रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले होते.  मृतांपैकी सुमारे ६१ टक्के रुग्णांनी लसीची एक किंवा दोन मात्रा घेतल्या होत्या, तर ३५ टक्के नागरिकांनी एकही मात्रा घेतलेली नाही. विशेष म्हणजे मृतांमधील सुमारे ४५ टक्के रुग्णांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या होत्या. मुंबईत साधारणपणे मृतांमध्ये लस घेतलेले आणि न घेतलेले यांचे प्रमाण अनुक्रमे ६० आणि ४० टक्के आहे. त्यामुळे लस न घेतलेल्यांनी लस किंवा लसीकरण पूर्ण न केलेल्यांनी दोन्ही मात्रा पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु लस घेतलेल्यांनीही करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन काटेकोरपणे करणेही गरजेचे आहे, असे मत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले.

प्रतिबंधात्मक मात्रा घेणे आवश्यक

 मृतांपैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना दीर्घकालीन आजार असल्याचे आढळले आहे, तर जास्तीत जास्त रुग्णांना दोनहून अधिक दीर्घकालीन आजार होते. तर कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांचे प्रमाण दहा टक्के आहे. ‘मृतांमध्ये सुमारे ४५ रुग्णांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या तरी काही रुग्णांमध्ये मात्र प्रतििपड पुरेशा प्रमाणात तयार झाल्याचे आढळलेले नाही. तसेच बहुतांश रुग्णांना गंभीर फुप्फुसांचे आजार, कर्करोग, अनियंत्रित मधुमेह इत्यादी दीर्घकालीन आजार तीव्र होते. त्यामुळे मृतांमध्ये करोनासह गंभीर श्वसनाचे आजार, न्युमोनिया, हृदयविकार, रक्तामध्ये संसर्गप्रसार (सेप्टिसेमिया) इत्यादी कारणांमुळे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी प्रतिबंधात्मक मात्रा घेणे आवश्यक आहे. तसेच लसीमुळे पूर्णपणे सुरक्षित असल्याचा गैरसमज न करता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, ’ असे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयातून अधिक रुग्ण दाखल  सेव्हन हिल्समध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ८३ टक्के रुग्ण हे मुंबई महानगर प्रदेशातून दाखल झाले होते. यातील बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. खासगी रुग्णालयात बरेच दिवस उपचार घेतल्यामुळे खर्च परवडत नसल्यामुळेही अनेक रुग्ण सेव्हन हिल्समध्ये दाखल झाले होते. या रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे यांना वाचविणे थोडे अवघड होते, अशी माहिती अडसूळ यांनी दिली.

८० टक्के ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

 मृत्यू झालेल्या १३९ रुग्णामध्ये सर्वाधिक १०८ रुग्ण (८० टक्के) हे ६० वर्षांवरील होते. त्याखालोखाल १८ टक्के ३० ते ६० वयोगटातील होते. ३० वर्षांखालील तीन रुग्णांचाही यात मृत्यू झाला असून हे प्रमाण २.२ टक्के आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचा कल तिसऱ्या लाटेतही आढळला आहे. सेव्हन हिल्समध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे ३२ टक्के तर पुरुषांचे प्रमाण याहून दुपटीने अधिक असून ६८ टक्के आहे.

आठ दिवसांत मृत्यचे प्रमाण अधिक

 दुसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मृत्यू हे रुग्ण दाखल झाल्यानंतर दुसऱ्या आठवडय़ानंतर होत असल्याचे आढळले होते. परंतु तिसऱ्या लाटेमध्ये मात्र पहिल्या सात दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सेव्हन हिल्समध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ६१ टक्के रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यापासून सात दिवसांत तर सुमारे चार टक्के रुग्णांचा मृत्यू २४ तासांमध्ये झाला आहे. त्याखालोखाल मृतांपैकी सुमारे २२ टक्के रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांमध्ये, तर सुमारे १० टक्के रुग्णांचा मृत्यू १५ ते ३० दिवसांत झाला आहे.