अभिषेक तेली
मुंबई : करोनाच्या खडतर काळानंतर पुन्हा एकदा जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी १८वी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा’ आज झाली. थंडीतही ‘हर दिल मुंबई’ चा नारा देत हजारो मुंबईकर नागरिक आणि जगभरातील धावपटू मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. तरुणाईचा सळसळता उत्साह हा ओसंडून वाहत होता. त्यांना तोडीस तोड उत्साहाने ज्येष्ठ नागरिकही मोठ्या जिद्दीने सहभागी झाले होते. त्या सर्वांत मालाडमधील २४ वर्षीय ‘वरुण सावंत’ या तरुणाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनसाठी अनेकांसाठी प्रेरणा ठरणाऱ्या व सर्वांना प्रोत्साहन देणाऱ्या पाच जणांसह वरुणचीही ‘प्रेरणादायी धावपटू’ म्हणून निवड करण्यात आली.
वरुण हा स्वमग्न (ऑटिस्टिक) असून त्याच्यासाठी साध्या गोष्टी करणेही अनेकदा आव्हानात्मक ठरते. परंतु तरीही तो जिद्दीने मुंबई मॅरेथॉनच्या ४२ किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉन गटात सहभागी झाला आणि अवघ्या ४.३० तासात ही मॅरेथॉन पूर्ण केली. वरुणने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.२० वाजता धावायला सुरुवात केली आणि स्पर्धेचे सर्व टप्पे पार करून सकाळी ९.२० वाजता आझाद मैदान येथे पोहचून मॅरेथॉन पूर्ण केली. त्याच्याबरोबर त्याचे प्रशिक्षक केतन आपटे आणि वडील राजेश सावंतही सहभागी झाले होते.
रनर अकॅडमी या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षक केतन आपटे यांनी वरुणकडून आठवड्यातून तीनदा धावण्याचा सराव करून घेतला. त्याचबरोबर वरुणचे शरीर सुदृढ करण्यासाठी, त्याच्यातील ताकद आणि मुख्य म्हणजे पायातील शक्ती वाढविण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली. दर रविवारी मालाड पश्चिम येथे वडिलांसोबत वरुण २० ते ३० किलोमीटर धावण्याचा सराव करतो. अनुजा पटेल या त्याच्या आहाराकडे लक्ष देतात. ‘टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये वरुणला मानचिन्ह देऊन ‘हर दिल मुंबई हिरो’ अशी त्याची ओळख करून दिली. त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. वरुणने आजवर स्वतःवर घेतलेल्या मेहनतीचे व परिश्रमाचे हे फळ आहे. स्वमग्नता (ऑटिझम) ही त्याची ओळख नसून त्याच्यातील एक भाग आहे. स्वमग्नतेमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर मात करून तो स्वतःची ओळख निर्माण करत आहे.
हेही वाचा >>> मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा
वरुणच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू अनेकांपर्यंत पोहोचल्यामुळे स्वमग्नतेशी लढणाऱ्या इतर मुलांच्या पालकांनाही आपल्या मुलांमधील गुणांना घेऊन पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल’, असे वरुणचे पालक राजेश सावंत व दर्शना सावंत यांनी सांगितले. ‘नेहमीप्रमाणे मुंबई मॅरेथॉन स्पर्धा खूप छान होती आणि मला धावताना मजा आली’, असे वरुण याने सांगितले. वरुण हा २०१७ पासून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याने आजवर सातारा हिल मॅरेथॉन, भोपाल अर्ध मॅरेथॉन, इगतपुरी ३५ किलोमीटर हिल चॅलेंज, समुद्रसपाटीपासून १११५० फुट उंचावरील लडाख पूर्ण मॅरेथॉन, १२ तासांची ८८.९१ किलोमीटरची स्टेडियम स्वरूपातील मॅरेथॉन पूर्ण केली आहे.