झटपट लॉटरीवर संपूर्ण देशात बंदी असतानाही मुंबईत राजरोसपणे झटपट लॉटरी ‘फ्री गिफ्ट कुपन्स’च्या नावाने जोरात सुरू असून अगदी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावातील आद्याक्षरे ‘पृथ्वी’, ‘अजित’ तसेच टोपणनावे ‘बाबा’, ‘दादा’ अशी वापरून शासनाच्या नाकावर टिच्चून लॉटरी माफियांनी आपली दुकाने थाटली आहेत. महिन्याकाठी मिळणाऱ्या भरमसाट हप्त्यांमुळे स्थानिक पोलीसही त्याकडे डोळेझाक करीत आहेत.
केंद्र शासनाच्या १९९८ च्या लॉटरीविषयक कायद्यानुसार, संपूर्ण देशात झटपट व एक अंकी लॉटरीला बंदी आहे. महाराष्ट्र शासनाची अधिकृत राज्य लॉटरी तसेच इतर राज्यांतील अधिकृत लॉटरी विकण्याचीच परवानगी आहे. मात्र मुंबईत लॉटरी सेंटरच्या नावाखाली उघडण्यात आलेल्या दुकानांतून राज्य लॉटरीऐवजी या ‘फ्री गिफ्ट कुपन्स’ची विक्री केली जात आहे. राज्य लॉटरीची विक्री केली, तर फक्त दोन ते तीन टक्के कमिशन मिळते. मात्र झटपट लॉटरीच्या विक्रीतून भरमसाट फायदा मिळतो. पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत या कुपन्सची जितकी विक्री होईल, तितका फायदा विक्रेत्याला मिळत असतो. पुरवठादार या कुपन्सचे गठ्ठे नाममात्र दरात विक्रेत्याला उपलब्ध करून देत असतात. पाच रुपये दर्शनी किमतीचा एक हजार कुपन्सचा गठ्ठा केवळ दोनशे रुपयांत मिळतो, तर पाचशे रुपयांचा गठ्ठाही केवळ तीन ते पाच हजारांत उपलब्ध होत असतो, अशी माहिती लॉटरी संघटनेचे नेते नाना कुटे-पाटील यांनी दिली. पृथ्वी, अजित, बाबा, दादा या नावांच्या झटपट लॉटरी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. अगोदरच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेला कामगारवर्ग मोठय़ा आशेने या लॉटरीच्या आहारी जात असून त्यांना कधीच ही लॉटरी लागत नाही.
आग्रीपाडा, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हे अड्डे जोरात सुरू आहेत. काही वेळा या अड्डय़ांवर पोलीसही आपले नशीब अजमावताना दिसतात. राज्य लॉटरीची छपाई करणाऱ्या नवी दिल्लीतील ग्यान या प्रिंटिंग प्रेसमध्ये या लॉटऱ्या छापल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी त्यात तथ्य नसून लॉटरी माफिया या लॉटऱ्यांची राज्यातच छपाई करीत असल्याचा दावा केला जात आहे.
झटपट लॉटरी म्हणजे काय?
वेगवेगळय़ा नावाने काढलेल्या कुपन्सवर ५, १०, ५०, १०० आदी पॉइंट असा उल्लेख असतो. परंतु ही कुपन्स घेणाऱ्यांकडून तेवढी रक्कम घेतली जाते. उजव्या कोपऱ्यात खरडले की, तीन अंकी क्रमांक दिसतो. संबंधित दुकानात एक चार्ट लावलेला असतो. त्यामध्ये हे तीनही क्रमांक नमूद असले तर रोख रक्कम मिळते.
या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अड्डे सुरु आहेत
* आग्रीपाडा : १० ’ ना. म. जोशी मार्ग : २५ ’ भोईवाडा : १५ ’ काळाचौकी : १०
* दादर : ८ ’ घाटकोपर : ८ ’ पंतनगर : ४
झटपट लॉटरीबाबत तक्रारी आल्या की, संबंधित पोलीस ठाण्यांना तात्काळ कारवाई करण्यास सांगितले जाते
– डॉ. सत्यपाल सिंग, पोलीस आयुक्त