मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आकारास येत असलेल्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रोच्या जाळ्याचे संचालन करण्यासाठी गोरेगावमधील आरे कॉलनीत मेट्रो भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केल्याने मेट्रो भवन वादात अडकले होते. एमएमआरडीएने आता आरेऐवजी दहिसर आणि मंडाले येथे मेट्रो भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दहिसर येथील मेट्रो भवनाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या इमारतीत केवळ आदेश आणि नियंत्रण केंद्र (कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर) असणार आहे. दरम्यान एमएमआरडीएच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.
मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ १४ मेट्रो मार्गिकांचे ३३७ किमी लांबीचे जाळे उभारत आहे. या सर्व मेट्रो मार्गिकांचे संचालन करण्यासाठी मेट्रो भवनाची अत्यंत आवश्यकता आहे. आरे कॉलनीमध्ये मेट्रो भवन उभारण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला होता. यासाठी येथील सर्व्हे क्रमांक ५९८ अ ही अंदाजे २.०३ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र आरे संरक्षित वन असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पाच्या आरेमधील कारशेडवरून मोठा वाद सुरू असताना त्यात मेट्रो भवनाची भर पडली. मात्र हा विरोध डावलून सरकारने २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले. आरेमध्ये होऊ घातलेल्या मेट्रो भवनाला सातत्याने कडाडून विरोध झाल्याने इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. परिणामी मेट्रो भवन रखडले.
सध्या अनेक मेट्रो मार्गिकांची कामे वेगात सुरू असून आता एक एक मार्गिका सेवेत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मेट्रो संचालनासाठीचे तातडीने मेट्रो भवन उभारणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने वादग्रस्त आरेतील जागेचा हट्ट सोडून मेट्रो भवनासाठी दोन जागा निश्चित केल्या आहेत. दहिसरमधील दोन खासगी भूखंड आणि मेट्रो २ ब ( डी. एन. नगर ते मंडाले) मार्गिकेतील कारशेड अशा दोन जागांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. एमएमआरडीएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहिसर आणि मंडाले या दोन्ही ठिकाणी मेट्रो भवनासाठी इमारत उभारण्यात येणार आहे. दहिसर मेट्रो भवनात केवळ कमांड आणि कंट्रोल सेंटर असणार आहे. तर मंडाले येथील १५ मजली इमारतीत कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, नियंत्रण केंद्र आणि अन्य काही सुविधा असणार आहेत. गुरुवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत दहिसर येथील मेट्रो भवनास मान्यता देण्यात आली. आता लवकरच जमीन ताब्यात घेऊन कामास सुरुवात करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरेमध्ये कारशेड, मेट्रो भवनच नव्हे तर इतर कोणताही प्रकल्प उभारण्यास आमचा विरोध आहे. आरे हे जंगल आहे आणि ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि एमएमआरडीएने आरेमध्ये होऊ घातलेला मेट्रो भवन प्रकल्प अन्यत्र हलविला ही स्वागतार्ह बाब आहे. आता सरकारने आरे कारशेडसाठीही अशीच भूमिका घ्यावी.- झोरु बाथेना, पर्यावरणप्रेमी