शिक्षण, समाज आणि राजकारणाचा अनोखा मेळ असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा नवाकोरा मराठी चित्रपट ११ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका विनोदी कथेतून समाजाला अंतर्मुख करणारा विचार ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात अनपेक्षित घडामोडी घडत असून माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजातील नैतिकता ढासळली असून ती वाढविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या निमित्ताने सयाजी शिंदे यांच्यासह दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, सागर वंजारी आणि अभिनेता पार्थ भालेराव यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.

समाजातील नैतिकता ढासळली

विविध स्तरांवर व्यक्ती घडत असतात. शिक्षण हा आयुष्य घडविण्याचा एक मार्ग आहे, परंतु पूर्वीचा काळ आणि आताचा काळ पाहिल्यास शिक्षण क्षेत्रासह समाजातील सर्वच क्षेत्रांतील नैतिकता ढासळली आहे. नैतिकतेची घटलेली टक्केवारी वाढविण्याची गरज आहे. समाजात काही प्रमाणात नैतिकतेने जगणारी माणसे आहेत, त्यामुळेच समाज सुरळीतपणे सुरू आहे. आपण अशा नैतिकतेने जगणाऱ्या माणसांसोबत उभे राहिले पाहिजे. त्यांच्या खाद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

जुनी कथा, नवीन मांडणी

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ ही संतोष शिंत्रे यांची कथा आहे. या कथेच्या अनुषंगाने मी चित्रपटासाठी पटकथा व संवाद लिहिले आहेत. त्यामुळे ही मूळ कल्पना संतोष शिंत्रे यांची आहे. रिकामटेकड्या लोकांना पावटे म्हणण्याचा प्रघात अगदी जुना आहे, ३०० ते ३५० वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये पावट्यांकडून काम करून घेतल्याचे संदर्भ आढळतात. आजघडीलाही गावांमध्ये पावटा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे आम्ही पावट्यांचा विषय नव्या पद्धतीने ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाच्या निमित्ताने आणला आहे. रिकामटेकड्या मुलांचा अनेकांना उपद्रव जाणवतो, मात्र कोणतीही आपत्ती येते तेव्हा मदतीसाठी ही मुलेच पुढे सरसावतात. त्यामुळे पावट्यांना एकत्र आणून त्यांचा अभ्यासक्रम, इन्स्टिट्यूट, कुलगुरू, शिक्षक आणि मुलांमधील संघर्ष अशी ही कथा गुंफलेली आहे, असे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी सांगितले.

मराठी भाषेला प्राधान्य देणे महत्त्वाचे

गेल्या अनेक वर्षांपासून एकाच वेळेस अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. जे चित्रपट लोकांना आवडतात, त्या चित्रपटासाठी चित्रपटगृहात निश्चितच गर्दी होते. परंतु जेव्हा एका चांगल्या विषयावर चित्रपट येतो, तेव्हा आपल्या मराठी भाषेसाठी व महाराष्ट्रासाठी प्रेक्षकांनी सर्वप्रथम मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत, त्यानंतर इतर भाषिक चित्रपट पाहावेत, किमान इतके प्राधान्य मराठीला द्यायलाच हवे, असेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.

एक वेगळी भूमिका आणि माझ्यासाठी शाळा

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव भारीच आहे. पावट्यांना एकत्र बांधणारी इन्स्टिट्यूट असावी, अशी मित्रमंडळींमध्ये चर्चा असते. कट्ट्यावरील चर्चेचा विषय खोलवर जाऊन रंजक पद्धतीने मांडलेला आहे, असे या चित्रपटात ‘अंशा’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता पार्थ भालेराव याने सांगितले. या भूमिकेचा बाज हा माझ्या आधीच्या भूमिकेसारखा वाटू शकतो, पण त्या भूमिकांची व्याप्ती ही मर्यादित होती. परंतु ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात संबंधित पात्राची खोली आणि आव्हाने जाणून घेत, संपूर्णत: अभ्यासानिशी भूमिका साकारली आहे, असे पार्थने सांगितले. चित्रपटात सगळेच दिग्गज कलाकार असल्याने त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. त्यांना अभिनय करताना पाहणे, हीच माझ्यासारख्या युवा कलाकारासाठी शाळा होती, असेही त्याने सांगितले.

पावट्यांची निवड करणे आव्हानात्मक

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाची संहिता आणि संवादशैलीच्या अनुषंगाने कलाकारांची निवड केल्याचे दिग्दर्शक सागर वंजारी यांनी सांगितले. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पार्थ भालेराव या मुख्य पात्रांची निवड करणे सोपे होते आणि या कलाकारांनी स्वत:चे काम चोखपणे केले आहे. पण संहितेत समाविष्ट नसलेल्या पण चित्रीकरणादरम्यान महत्त्वाच्या वाटत गेलेल्या विशेषत: पावट्यांची भूमिका करण्यासाठी कलाकारांची निवड करणे आव्हानात्मक होते, असे त्यांनी सांगितले. या भूमिकांसाठी ९०० जणांच्या ऑडिशन्समधून ५० जणांची निवड करताना कसोटी लागली, असेही सागर वंजारी यांनी सांगितले.

चित्रभाषा समजणारे दिग्दर्शक

मी आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतु एक वेगळी विनोदी भूमिका ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने साकारायला मिळाली. विविध विषयांवर भाष्य करणारा, भावनांचे अनेक कंगोरे असलेला आणि दरवेळी पावट्यांची धमाल घडवून बाजूला होणारं असं मजेशीर पात्र मी यात साकारलं आहे, असं सांगतानाच सयाजी शिंदे यांनी दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांच्यातील उत्तम समन्वयाचे कौतुक केले. या दोघांनाही चित्रभाषा आणि चित्रपटातील कलात्मकता समजते. एखाद्या प्रसंगाला विनोदाची जोड आणि सामाजिक जाणिवेची जोड कशी द्यावी, हेसुद्धा त्यांना कळते. त्यामुळे माझी भूमिका मला प्रेक्षकांसमोर व्यवस्थित मांडता आली, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.