मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतील. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या जयंती सोहळ्याचे सर्व संबंधित विभाग व यंत्रणा, पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनासह योग्य समन्वयाने भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव चहल, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.
चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महानगरपालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करावी.
त्यामध्ये उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारावेत. उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असावी. दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण करावे व त्यासंदर्भात जागोजागी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर स्थानक ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना ये-जा करण्यास सुविधा होईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली.