मुंबई : महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात हाती घेतलेल्या योजना, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र हा नुसता सराव सामना असून खरी कसोटी, वनडे, २०:२० सामना पुढे खेळायची आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयीन सचिवांना दिला.

सर्व विभागांनी येत्या १ मेपर्यंत नियोजित केलेली कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार २६ विभागांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. उद्याही उर्वरित २२ विभागांचा आढावा घेतला जाणार आहे. आजच्या बैठकीत सचिवांनी आपल्या विभागांनी केलेल्या कामांचे सादरीकरण केले. यात ४० टक्के कामे पूर्ण झाली असून ४० टक्के कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

तर २० टक्के कामे झालेली नसल्याचे समोर आले. त्यावर ही कामे अपूर्ण का राहिली याचा खुलासा करण्याच्या सूचना देतानाच ज्यांनी चांगली कामे केली आहेत अशा विभागांचे कौतुकही फडणवीस यांनी केले. तसेच १०० दिवसांचा कार्यक्रम हा केवळ सराव सामना असून खरी कसोटी सामना, वनडे पुढे खेळायची आहे. प्रत्येक विभागांनी हाती घेतलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत असे आदेशही फडणवीस यांनी दिले. या मोहिमेंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११ कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे सर्व विभागांनी येत्या १ मे पर्यंत पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही फडणवीस यांनी दिले.

शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतिमान काम करून लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहे. त्यातून शासनाप्रति जनतेमध्ये चांगला दृष्टिकोन तयार होत आहे. शंभर दिवस कार्यक्रम ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असून जिल्हास्तरावरही चांगला बदल होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभीर्याने यशस्वी केला आहे. अनेक विभागांनी यामध्ये उत्तम काम केले आहे. नागरिकांना या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवसांसाठी कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. विभागांनी गतिमानतेने लोकोपयोगी कामे गुणवत्तेसह आणि कालमर्यादेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी विभागांनी आपल्या स्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी. उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तांत्रिक, प्रशासकीय आणि इतर आनुषंगिक बाबींची तातडीने पूर्तता करावी. विभागांनी उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आदेशही फडणवीस यांनी या वेळी दिले.