अक्षय मांडवकर
राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगतच्या घटना
बोरिवलीतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या हद्दीलगत बिबटय़ाचे दर्शन वरचेवर घडू लागले आहे. त्याची छायाचित्रे टिपण्यासाठी, चित्रीकरण करण्यासाठी परिसरातील तरुण गर्दी करीत आहेत. यापैकी काही तरुण बिबटय़ाला वेडावून दाखवतात, हुसकावण्याचा प्रयत्न करतात, अशी परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. यामुळे कधी तरी गंभीर प्रसंग उद्भवू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
उद्यानाच्या हद्दीलगतच्या परिसरात बिबटय़ाचे दर्शन होणे येथील रहिवाशांना नवे नाही, मात्र बोरिवलीच्या ‘ऋषीवन’सारख्या परिसरात गेले काही दिवस हौशी व अतिउत्साही तरुणांनी उच्छाद मांडला आहे. बिबटय़ाला पाहण्यासाठी आपली वाहने दामटवत ही मंडळी मध्यरात्री येथे येतात. बिबटय़ा दिसताच मोठमोठय़ाने आवाज करून त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्याची छायाचित्रे टिपणे, चित्रीकरण, हुसकावणे असे प्रकार करतात. या तरुणांना आवर घालण्याकरिता येथे पोलीस किंवा वन विभागाचे कर्मचारी नसतात.
राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगत असलेल्या मुलुंड, भांडुप, बोरिवली, मालाड, घोडबंदर गाव या परिसरांतील नागरी वसाहतींत गेल्या काही दिवसांपासून एक-दोन दिवसांआड बिबटय़ाचे दर्शन घडत आहे. बिबटय़ा आणि मानवाच्या सहजीवनाबाबत वन विभाग सातत्याने जनजागृती करतो. त्यामुळे येथील रहिवासी बिबटय़ा दिसण्याच्या घटनांना सरावले आहेत. गणेशोत्सवानंतर तर घोडबंदर गाव आणि मुलुंडच्या शंकर टेकडी परिसरात वारंवार बिबटय़ाचे दर्शन घडत आहे. बोरिवलीच्या ऋषीवन परिसरातही बिबटय़ांचा वावर सुरू असतो. उद्यान आणि बोरिवलीचे ऋषीवन यांच्यामध्ये दोन वर्षांपूर्वी वन विभागाकडून भिंत उभारण्यात आली. या भिंतीवर अनेकदा मध्यरात्री बिबटय़ा येऊन बसतो. बोरिवलीच्या कृष्णगिरी उपवन परिक्षेत्रात हा परिसर येतो. एका बांधकाम स्थळाला लागूनच ही भिंत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी प्रखर प्रकाशझोताचे दिवे लावले आहेत. माकड आणि हरणांच्या कलकलाटाने बिबटय़ा आल्याची ‘वर्दी’ स्थानिकांना मिळते. प्रखर प्रकाशामुळे बिबटय़ा नजरेसही पडतो.
गेल्या काही महिन्यांपासून मध्यरात्री काही बाइकस्वार बिबटय़ाला पाहण्यासाठी येतात. तो दिसताच हुल्लडबाजी करतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्रीदेखील असाच प्रकार घडला. पोलिसांची गाडी येताच ही मंडळी पळ काढतात. मात्र काही वेळाने पुन्हा त्यांची गर्दी होते अशी माहिती एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे; परंतु हे प्रकार सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी पोलीस किंवा वन विभागाची चौकी उभारण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
या प्रकरणाबाबत स्थानिक रहिवाशांकडून तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र असे घडत असल्यास स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून यामध्ये लक्ष घालण्यात येईल.
– शैलेश देवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृष्णगिरी उपवन
गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी मध्यरात्री बघ्यांची गर्दी होत आहे. काही बाइकस्वार भिंतीवर बिबटय़ा दिसताच हुल्लडबाजी करतात.
– राजेश पाटील, रहिवासी