मुंबई : नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान होते, शेतकरी देशोधडीला लागतात. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील अनेक राज्यांत पीकविमा योजना सुरू आहे. पण, या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी विमा कंपन्यांनाच होताना दिसत आहे. गत पाच वर्षांत विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटींचा नफा मिळविला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई दिवसोंदिवस कमी होताना दिसत आहे.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळी वारे, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली. पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे हा पीकविमा योजनेचा मूळ उद्देश असला तरीही दिवसोंदिवस शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी कमी होत गेली आणि कंपन्यांचा नफा वाढत गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे पीकविमा योजनेचा मूळ हेतू साध्य झाला नसल्याची स्थिती आहे. देशातील स्थिती पाहिली असता, २०१९ – २० ते २०२३ – २४ या पाच वर्षांत एकूण १७ पीक विमा कंपन्यांना १ लाख, ५४ हजार, ५४३ कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता भरला आहे. या काळात विमा भरपाईपोटी शेतकऱ्यांना १ लाख, ०५ हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. उर्वरीत ४९,७०४ कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमाविला आहे.

महाराष्ट्रातून साडेदहा हजार कोटीचा नफा

राज्यात २०१६-१७ पासून राज्यात पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. २०१६-१७ ते २०२३-२४, या आठ वर्षांत शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा एकूण ४३,२०१ कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांना मिळाला. कंपन्यांनी भरपाईपोटी ३२,६१० कोटी रुपयांची भरपाई मिळाली, तर विमा कंपन्यांना १०,५९१ कोटींचा नफा मिळाला. २०२०-२१ या वर्षात विमा कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. या वर्षात एकूण ५,८०६.२१ कोटी रुपयांचा हप्ता कंपन्यांना गेला. कंपन्यांनी १,४३१.३४ कोटी रुपयांची भरपाई दिली. एका वर्षात कंपन्यांना ४,३७४.८७ कोटी रुपयांचा फायदा झाला. विमा हप्त्याच्या तुलनेत फक्त २५ टक्के भरपाई मिळाली. २०२२-२३ पासून पीकविम्याचा बीड प्रारुप ८०:११० राज्यात लागू झाले. त्यानंतर भरपाईची रक्कम वाढली आहे.

वर्ष विमा हप्ता – भरपाई रक्कम – कंपन्यांचा नफा (रक्कम कोटीत)

२०१९-२० ३२,२६१.८६ २७,९१३.३० ४,३४८.५६

२०२०-२१ ३१६६५.५३ २१,२२५.०५ १०,४४०.४८

२०२१-२२ ३०,०३५.१९ २०,८५०.६९ ९,१८४.५

२०२२-२३ ३१,११५.१७ १८,३८५.१४ १२,७३०.०३

२०२३-२४ २९५०५.८२ १६,५०४.५४ १३,००१.२८

पीकविम्याची फेररचना होणार

पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. विमा कंपन्यांच जास्त फायदा झाला आहे. एक रुपयात पीकविमा योजनेमुळे भ्रष्टाचार, गैरव्यवहार वाढून सरकारचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभाग पीकविमा योजनेची फेररचना करणार आहे. लवकरच त्या बाबतची घोषणा केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.