एकात्मिक सुरक्षा यंत्रणेचा दुसरा टप्पा

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील ४७ स्थानकांत एकात्मिक सुरक्षा यंत्रणेचा (इंटिग्रेटेड सिक्युरिटी यंत्रणा) दुसरा टप्पा राबविण्यात येणार असून त्यामुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील ३०, तर मध्य रेल्वेवरील १७ स्थानकांचा समावेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे होत असतानात रेल्वे स्थानकांतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यानंतर देशभरातील २०२ रेल्वे स्थानकांत एकात्मिक सुरक्षा यंत्रणेंतर्गत सुरक्षेचे विविध उपाय योजण्यात आले. यामध्ये मुंबईताल स्थानकांचाही समावेश होता. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करताना मुंबईतील ४७ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली, चर्चगेट, मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, राम मंदिर, मालाड, कांदिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार या स्थानकांचा समावेश आहे. डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही, बॅगेज स्कॅनर मशीन यासह अन्य काही सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येतील.