मुंबई : राज्यभरात उद्यापासून पोलिस भरती सुरू होत असून बँड्समन या पदासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. या पदाच्या एका जागेमागे ७८१ उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यातील पोलिस भरती बुधवारपासून सुरू होत असून सुरूवातीला मैदानी चाचणी नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे. यंदाही अवघ्या काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेत आहेत. एकाजागेसाठी १०१ उमेदवार असे उपलब्ध जागा आणि आलेले अर्ज यांचे गुणोत्तर आहे.

पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी ४१ जागा आहेत. त्यासाठी ३२ हजार २६ अर्ज आले आहेत.

हेही वाचा…मुंबई : घरातील डास उत्पत्ती रोखण्याचे महानगरपालिकेसमोर आवाहन

त्याशिवाय तुरूंग विभागातील शिपाई (प्रिझन कॉन्स्टेबल) या पदाच्या एका जागेमागे साधारण २०७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी १८०० जागा उपलब्ध आहेत तर ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज आले आहेत. चालक पदासाठी एका जागेमागे साधारण ११७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदाच्या १६८६ जागा उपलब्ध असून १ लाख ९८ हजार ३०० अर्ज आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल) पदासाठी आहेत. या पदाच्या ९५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण ८६ उमेदवार असे प्रमाण आहे. शीघ्र कृती दलातील ४ हजार ३४९ जागा असून त्यासाठी ३ लाख ५० हजार ५९२ अर्ज आले आहेत. एका जागेसाठी ८० उमेदवार स्पर्धेत आहेत.

हेही वाचा…मुंबई : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, मुलुंडमधील घटना

अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. यंदा आलेल्या अर्जांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक अर्ज हे उच्चशिक्षित उमेदवारांचे आहेत. शासकीय नोकरीचे आकर्षण आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये घटत्या संधी यांमुळे अर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण आजी-माजी अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. साधारण ऑक्टोबरमध्ये उमेदवारांची निवड पूर्ण होऊन त्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.

Story img Loader