मुंबई : बहुप्रतिक्षित व बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक नुकतीच पार पडली. एकूण १० जागांसाठी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निकालाकडे विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष व विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले असून अधिकाधिक जागा जिंकून मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेली नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक होईल की नाही, यासंदर्भात सुरुवातीपासूनच विद्यार्थी संघटना व पदवीधरांमध्ये साशंकता होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी १३ हजार ४०६ नोंदणीकृत पदवीधर मतदारांपैकी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा – अधिसभा निवडणुकीचा निकाल आज; याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यापैकी युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा १ आणि ३ जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे, या निवडणुकीत थेट युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यातच सामना होत आहे. तर अपक्ष उमेदवारांची मतेही निर्णायक ठरणार आहेत.
हेही वाचा – आज मुंबईत पावसाची काय स्थिती? लोकल ट्रेन वेळेवर आहेत का? वाचा सविस्तर माहिती!
युवा सेना १० पैकी १० जागा राखणार?
मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने २०१० साली १० पैकी आठ जागा आणि २०१८ साली १० पैकी १० जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे यंदाही युवा सेना मतदार नोंदणी, प्रचार आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सक्रिय होती. दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाने १० पैकी १० जागा लढवून युवा सेनेला आव्हान दिले आहे.