झटपट पैसा कमविण्यासाठी भामटे नवनवीन क्लृप्त्या लढवीत असतात आणि त्या योजनेतील आमिषाचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यातूनच मग भामटय़ांच्या मोहपाशात अडकून अनेकजण स्वत:ची फसवणूक करून घेतात. अशा फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमध्ये पैशांचे व्यवहार रस्त्यावरच होत असल्यामुळे त्या भामटय़ांविषयी पुरेशी माहिती फसवणूक झालेल्या व्यक्तीकडेही नसते. कोणताही धागादोरा नसल्याने अशा भामटय़ांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनाही युक्ती लढवावी लागते आणि काही वेळेस भामटय़ांच्या अटकेसाठी त्यांच्याच गुन्ह्य़ाच्या पद्घतीचा अवलंब पोलीस करतात. अशाच प्रकारे अमेरिकन डॉलरचे आमिष दाखवून ठाण्यातही एका तरुणाची भामटय़ांनी फसवणूक केली, पण ठाणे पोलिसांनी या भामटय़ांना त्यांच्याच ‘गुन्हे स्टाइल’मध्ये पकडले. त्याच गुन्ह्य़ाची ही सविस्तर कथा..

ठाणे येथील राबोडी परिसरात २४ वर्षांचा मोहसीन शेख राहतो. तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर जिनाजपूर जिल्ह्य़ामधील इस्लामपूरचा रहिवाशी आहे. त्याचे आई-वडील आणि भाऊ असे सर्वजण गावीच राहतात. त्याचे वडील गावी शेती करतात. ठाण्यातील राबोडी परिसरात त्याचे चुलते कमरुन शेख राहतात. सहा वर्षांपूर्वी मोहसीन त्यांच्याकडे राहण्यासाठी आला. कमरून यांचा राबोडी भागात एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय असून त्यांच्यासोबतच मोहसीन काम करतो. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दोन महिन्यांपूर्वी सायंकाळच्या वेळेस तो ठाण्यातील प्रभात टॉकीजच्या परिसरात फिरायला गेला. परिसरात फिरत असताना तो एका दुकानाजवळ थांबला. तिथे एक व्यक्ती त्याला भेटली आणि त्याने त्याचे नाव व पत्ता विचारण्यास सुरुवात केली. यामुळे मोहसीन यानेही त्याची चौकशी केली. त्यामध्ये त्याने त्याचे नाव शाहीद असल्याचे सांगितले. या भेटीदरम्यान दोघे एकमेकांची चौकशी करीत होते. त्याच वेळेस शाहीदने ‘माझे तुझ्याकडे एक काम आहे, ते तू करशील का’अशी विचारणा केली. त्यावर ‘काय काम आहे’, असे मोहसीनने त्याला विचारले. तेव्हा त्याने ‘माझ्याकडे प्रत्येकी २० अमेरिकन डॉलर किमतीच्या एकूण १४१० नोटा आहेत. या नोटा तुला हव्या असतील तर त्या मी तुला देऊ शकतो. त्या बदल्यात दोन लाख रुपये द्यावे लागतील’ असे शाहीदने सांगितले. पैशांची गरज असल्यामुळे या किमती नोटा विकत आहे. माझे राहणीमान पाहून माझ्याकडून कुणीही नोटा घेणार नाही. या नोटांची किंमत दोन लाखांपेक्षा जास्त आहे, अशा भूलथापा त्याने दिल्या. या सर्वाला बळी पडत मोहसीनने नोटा घेण्याची तयारी दाखविली. या व्यवहारात मोहसीनचा विश्वास बसावा म्हणून शाहीदने त्याला २० डॉलर किमतीची एक नोट दिली. ही नोट खरी आहे का ? याची खात्री करून घेण्यास सांगितले. तसेच त्याने स्वत:चा मोबाइल क्रमांक दिला आणि त्याचा क्रमांकही घेतला. त्यानंतर मोहसीन घरी परतला आणि त्याने परिसरातील नागरिकांना ती नोट दाखविली. या चौकशीदरम्यान ही नोट खरी असल्याचे अनेकांनी त्याला सांगितले. त्यामुळे त्याने पुढील व्यवहार करायचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच शाहीदने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला आणि नोटांच्या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी मोहसीनने त्याला नोटा घेण्यास तयार असल्याचे सांगितले. या व्यवहारासाठी दोन लाख रुपये नाहीत, पण ५० हजारांची जमवाजमव केल्याचे त्याने त्याला सांगितले. त्यावर इतक्या पैशात ३५० नोटा देण्याची तयारी शाहीदने दाखविली आणि त्या व्यवहारासाठी मोहसीनही तयार झाला. राबोडी परिसरातील एका रस्त्यावर हा व्यवहार करायचे ठरले. तिसऱ्या दिवशी शाहीद आणि त्याचा साथीदार हफीजुल असे दोघे ठरलेल्या ठिकाणी आले. ठरल्याप्रमाणे मोहसीन पैसे घेऊन तिथे आला आणि त्याने पैसे त्यांच्याकडे दिले. त्यानंतर शाहीदने त्याला हातातील पिशवी दिली आणि त्यात ३५० नोटा असल्याचे सांगितले. तसेच पिशवीतील नोटाची खात्री करून घ्या असा सल्ला देऊन दोघे तेथून पसार झाले. मोहसीन घरी परतला. त्याने पिशवी उघडून पाहिली असता, त्यात कागदांची रद्दी होती. तेव्हा त्याने शाहीदला मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मोबाइल बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा राबोडी पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार एस. टी. तावडे यांना या गुन्ह्य़ातील भामटय़ांची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पथकाने या भामटय़ांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक ए.म्डी. फणसेकर, पोलीस हवालदार एस. टी. तावडे, जी.टी. सावंत, बी.सी. थाटे, ए. आर. देसाई, पोलीस नाईक जी.बी. जाधव यांचा पथकात समावेश होता. या भामटय़ांच्या गुन्ह्य़ाच्या पद्धतीचा सविस्तर अभ्यास करून त्यांना पकडण्यासाठी पथकाने त्यांची पद्धत अवलंबली. ठाणे स्थानक परिसरात शाहीद फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार नोटांचा व्यवहार करण्यासाठी इच्छुक असल्याचे भासवून पथकाने त्याला जेरबंद केले. या गुन्ह्य़ात शाहीद आलम शाहीद कासम शेख (२६) आणि मोहमद हफीजुल शेख मजीबुल शेख (३२) या दोघांना अटक केली. हे दोघेही मु़ळचे दिल्लीचे रहिवाशी असून ते सध्या मुंबई तसेच नालासोपारा परिसरात राहात होते. तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील एका भंगाराच्या दुकानात शाहीद काम करीत होता. या दुकानाशेजारीच कुंदरूसचे घर आहे. तो मुंबईत राहात असून अधूनमधून दिल्लीतील घरी येतो. त्याच्यासोबत शाहीदची ओळख झाली होती. तसेच शाहीदने त्याच्या बहिणीसोबत विवाह केला. त्यामुळे हे दोघे नातेवाईक झाले होते. मुंबई परिसरात नागरिकांना गंडा घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे काम कुंदरुस करीत असे. त्यानेच शाहीदला असे फसवणुकीचे गुन्हे करण्यास शिकविले. तसेच कुंदरूसच्या घराच्या परिसरातच हफीजुलच्या नातेवाईकांचे घर असून तिथे तो नेहमी येत असे. त्यामुळे त्याची दोघांशी ओळख झाली होती आणि त्यातूनच गेल्या काही महिन्यांपासून तो त्यांच्यासोबत फसवणुकीचे गुन्हे करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे.